दापोली :
दापोली नगरपंचायतीत राष्ट्रवादीमधून शिंदे गटात गेलेल्या व ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्यांनी मिळून आपला 14 जणांचा वेगळा गट स्थापन केला आहे. याबाबत सर्वांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन या गटावर शिक्कामोर्तब केले. यामुळे नगरपंचायतीत सत्ताधारी महाविकास आघाडी अल्पमतात आली आहे.
दापोली नगर पंचायतीमध्ये सध्या प्रचंड राजकीय उलतापालथ सुरू आहे. राष्ट्रवादीतून उबाठा गटात गेलेल्या 7 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवकांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला. तसेच ठाकरे गटातील पाच जणांनीही नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे शिवसेना शिंदे गटाचे सदस्य मताधिक्य वाढून 14 वर जाऊन पोहोचले. या 14 जणांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे आपला 14 जणांचा एकच वेगळा गट स्थापन करत असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी या गटाला मान्यता दिल्याचे सांगण्यात आले.
गुरुवारी रात्री या चौदा जणांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बैठकीत नगराध्यक्षा ममता मोरे (ठाकरे सेना) यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याबाबत रणनिती ठरवल्याची माहिती महायुतीच्या सूत्रांनी दिली. यामुळे दापोली नगर पंचायतीला लवकरच नवीन नगराध्यक्ष मिळणार, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. नगरपंचायतीत उर्वरित दोन सदस्यांमध्ये साधना बोत्रे (राष्ट्रवादी) आणि जया साळवी (भाजप) यांचा समावेश आहे.








