दुकानातील साहित्य चोरट्यांनी लांबविले
वार्ताहर / किणये
सर्व्हिस रोड, हालगा येथील किराणा दुकान चोरट्यांनी फोडले आहे. दुकानाच्या मुख्य दरवाजाची कडी तोडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश करून साहित्य लांबविले आहे. सदर चोरीचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला असून ही चोरी शुक्रवारी रात्री झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.
सुवर्णविधानसौध जवळील पुणे-बेंगळूर महामार्गाच्या बाजूने गेलेल्या हालगा- बस्तवाड सर्व्हिस रस्त्यावरील हालगा गावाजवळ सुरेश गुंडू कामानाचे यांचे किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी रात्री दुकान बंद करून गेले होते. शनिवारी सकाळी सातच्या दरम्यान दुकानात आले असता चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला.
शुक्रवारी रात्री चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कडी तोडून निरमा पावडर, ब्रश, साबण, तसेच मसाल्याचे साहित्य, साखर आदी सुमारे पंधरा हजार रुपयांचे साहित्य लांबविले असल्याची माहिती सुरेश यांनी दिली आहे.
गावाजवळील दुकानात चोरीचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सुवर्णविधानसौध परिसरातील पोलिसांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली.
हालगा या गावात नेहमीच नागरिकांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. पुणे-बेंगळूर मार्गासह सर्व्हिस रस्त्यावरूनही वाहने ये-जा करीत असतात. मात्र रस्त्याजवळील किराणा दुकानात चोरीचा प्रकार घडल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.









