सम्राट क्लबच्या स्पर्धा उद्घाटनावेळी खासदार तानवडे यांचे प्रतिपादन : लोकमान्य रंगमंदिरात प्राथमिक फेरी पार
बेळगाव : संगीत म्हणजे एकमेकांना जोडणारा दुवा आहे. संगीतामुळे जीवनामध्ये आनंदी राहता येते. ही एक आराधना असून प्रत्येकाची गायकी ही वेगळी असते. कितीही मोठे शिक्षण घेतले तरी संगीतापासून दूर जाता येत नाही. गोव्याच्या सम्राट क्लब इंटरनॅशनलने तळागाळातील अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिल्याने आज ते उत्तम कामगिरी बजावत आहेत, असे उद्गार गोव्याचे खासदार सदानंद तानवडे यांनी काढले. रविवारी सम्राट क्लब इंटरनॅशनल आयोजित ‘सम्राट संगीत सितारा’ या शास्त्राrय गायन स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. बेळगावच्या लोकमान्य रंगमंदिर येथे ही प्राथमिक फेरी पार पडली. खासदार सदानंद तानवडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, माजी अध्यक्ष दीपक नार्वेकर, गोवा इलेक्ट्रिकचे नवीन पै रायकर, ‘तरुण भारत’चे गोवा निवासी संपादक सागर जावडेकर, सम्राट क्लब इंटरनॅशनलचे अध्यक्ष प्रवीण सबनीस, पांडुरंग गावकर, उषा नार्वेकर, सर्वेश फुलारी यासह इतर सदस्य उपस्थित होते.
डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो म्हणाले, क्षेत्र कोणतेही असो, मेहनत महत्त्वाची आहे. सध्या तरुणाई शॉर्टकटचा पर्याय अवलंबत असली तरी कष्टाला कुठेही शॉर्टकट नसतो. संगीतामध्येही ज्याचा रियाज आहे, त्यालाच यश मिळाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कष्टाला कुठेही शॉर्टकट नसतो, असे त्यांनी ठासून सांगितले. सागर जावडेकर व प्रवीण सबनीस यांनी सम्राट क्लबच्यावतीने आयोजित शास्त्राrय संगीत स्पर्धेविषयी माहिती दिली. स्पर्धेमध्ये बेळगावमधून बारा स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. यापैकी तीन स्पर्धकांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरी साखळी येथील रवींद्र भवन येथे होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. बेळगावच्या हर्षिता शिवणगेकर हिने भरतनाट्याम सादर केले. यावेळी बेळगाव व गोवा येथील रसिकश्रोते उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन सम्राट क्लब केरी-सत्तरी यांच्यावतीने करण्यात आले होते.
बेळगावकर आणि गोमंतकीयांचे अतूट नाते
राज्य वेगळे असले तरी गोवा, सावंतवाडी, बेळगाव येथे सांस्कृतिक साम्य आहे. गोवा मुक्ती संग्रामात बेळगावच्या लढवय्या नागरिकांनी मोठा पाठिंबा दिल्यामुळेच गोवा स्वतंत्र होऊ शकला. गोवा आणि बेळगाव यामध्ये व्यापार, पर्यटन, खाद्य संस्कृती यात समन्वय असल्याचे दिसून येते. बेळगावचे लोक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गोव्याला येतात. गोव्याचे लोक थंड हवामान आणि व्यापारासाठी बेळगावमध्ये येत असतात. त्यामुळे हे नाते यापुढेही असेच संगीतातील सुरांप्रमाणे जपले पाहिजे, असे खासदार तानवडे यांनी सांगितले.









