सध्या चर्चा चाललीय ती संयुक्त अरब अमिरातीत चाललेल्या आशिया चषकाची आणि त्यातील सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या धडाक्याची…ही स्पर्धा संपेपर्यंत भारतात सुरू होणार तो महिलांचा एकदिवसीय सामन्यांचा विश्वचषक. आपल्या महिला संघाला आजपर्यंत ‘आयसीसी’ स्पर्धेचा किताब खात्यावर जमा करता आलेला नाहीये. हरमनप्रीत कौरच्या अधिपत्याखालील चमूसमोर यावेळी ते स्वप्न पूर्ण करून एक उणीव दूर करण्याच्या दृष्टीनं नामी संधी चालून आलीय…
साल 2017…दिग्गज महिला क्रिकेटपटू मिथाली राजच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात सहभागी झाला तेव्हा अपेक्षा जवळजवळ नव्हत्याच. कारण त्याच्या चार वर्षं आधी घरच्या मैदानांवर स्पर्धा होऊनही भारताच्या वाट्याला आलं होतं ते निराशाजनक सातवं स्थान…मात्र आठ वर्षांपूर्वीच्या त्या स्पर्धेत सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौरनं केलेल्या नाबाद 171 धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर उपांत्य फेरीत बलाढ्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारून त्यांना चक्क उपविजेतेपद खात्यात जमा करणं शक्य झालं…
भारत अंतिम फेरीत जिंकू शकला नाही अन् इंग्लंडकडून नऊ धावांनी पराभूत व्हावं लागलं. मात्र या कामगिरीमुळं महिला संघाला ओळख मिळाली, प्रगतीच्या वाटा खुल्या झाल्या…आणखी चार दिवसांनी सुरू होणार असलेल्या यावेळच्या विश्वचषक स्पर्धेत त्याहून एक पाऊल पुढं हरमनप्रीतचा संघ जाऊ शकेल काय ?…त्या नि यावेळच्या स्पर्धेच्या बाबतीत दिसून येणारा एक महत्त्वाचा फरक म्हणजे भारतीयांची अलीकडच्या काळातील सुरेख कामगिरी अन् विश्वचषक मायभूमीत होत असल्यानं संघावर येऊन पडलेला अपेक्षांचा भारी बोजा…2017 मधील चमूचा भाग राहिलेल्या हरमनप्रीत, स्मृती मानधना व दीप्ती शर्मा अजूनही भारताचा जेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आणण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आशास्थानं आहेत…
2017 साली बडोद्याचे माजी अष्टपैलू खेळाडू तुषार आरोठे हे संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. त्यांच्या मते यावेळचा संघ सर्वोत्तम असून तो भारताला पहिला ‘आयसीसी’ किताब मिळवून देऊ शकतो…‘मानधना, हरमन, जेमिमा, राधा यादव आणि क्रांती गौडसारख्या खेळाडू चमत्कार करू शकतात. अमोल मुझुमदार यांनी प्रशिक्षक म्हणून उत्तम काम केलंय’, आरोठे म्हणतात…भारतीय संघ त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात करेल तो 30 सप्टेंबर रोजी गुवाहाटीत होणाऱ्या श्रीलंकेविऊद्धच्या सामन्यातून. ‘बीसीसीआय’च्या वरिष्ठ महिला निवड समितीनं अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि तऊण प्रतिभा यांचं मिश्रण असलेला संतुलित 15 सदस्यीय संघ निवडलाय. त्यामुळं विविध सामन्यांतील परिस्थितीशी जुळवून घेण्याची, दबाव पेलण्याची क्षमता तसंच फलंदाजी अन् गोलंदाजीची खोलीही वाढलीय…
यापैकी कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्स नि दीप्ती शर्मा यासारख्या खेळाडूंना विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचा अनुभव आहे, तर अऊंधती रे•ाr, प्रतीका रावल, अमनज्योत कौर, क्रांती गौड आणि राधा यादव यांच्यात भरलीय ती तऊणाईची ऊर्जा अन् विशेष कौशल्यं…उपकर्णधार स्मृती मानधना नि प्रतीका रावल ही सलामीची जोडी भारताच्या यशाचा कणा राहील असं म्हट्यास ते वावगं ठरू नये. आधी खेळताना मोठी धावसंख्या उभारणं असो किंवा अवघड लक्ष्याचा पाठलाग करणं असो, संघ चांगल्या सुऊवातीसाठी त्यांच्यावर नेहमीच अवलंबून असतो…
जानेवारी, 2024 पासून मानधना व प्रतीका यांनी सातत्यानं चांगली कामगिरी केलीय. त्यांनी फक्त 14 डावांमध्ये मिळून 77.57 च्या उत्कृष्ट सरासरीनं 1,086 धावा जमविल्याहेत. त्यात समावेश सहा अर्धशतकी नि चार शतकी भागीदाऱ्यांचा. या कालावधीत 1 हजार धावांचा टप्पा ओलांडणारी ही एकमेव जोडी. त्यावरून या प्रतापाचं महत्त्व लक्षात यावं….भारतीय भूमीवरील त्यांची आकडेवारी तर आणखी प्रभावी. सहा डावांमध्ये 116.83 च्या सरासरीनं 701 धावा. यामध्ये एक अर्धशतकी भागीदारी आणि चार शतकी भागीदाऱ्या…
प्रतीकाच्या आगमनानंतर मानधनानं तिच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनातही लक्षणीय बदल घडवून आणलाय. तिनं यंदा विलक्षण आक्रमक खेळ केलेला असून एकदिवसीय सामन्यांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच एका कॅलेंडर वर्षात 900 पेक्षा जास्त धावा खात्यात जमा केल्याहेत. असा पराक्रम गाजविणारी ती महिला क्रिकेटच्या इतिहासातील केवळ दुसरी खेळाडू…स्मृतीला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात 1000 धावा करणारी पहिली क्रिकेटपटू ठरण्यासाठी आवश्यकता आहे ती फक्त 72 धावांची…या वर्षी तिनं 14 सामन्यांमध्ये 66.28 च्या सरासरीनं तसंच 115.85 च्या स्ट्राईक रेटनं नेंदविल्याहेत त्या 928 धावा. त्यात चार शतकांचा समावेश…मानधनाच्या जबरदस्त तळपणाऱ्या बॅटचा नुकताचा प्रसाद मिळालाय तो ऑस्ट्रेलियाला. भारतानं कांगारुंना मालिका सहजासहजी खिशात घालू दिली नाही आणि त्याचं बरंचसं श्रेय जातं ते तिलाच. स्मृतीनं दोन शतकांसह तीन डावांत लयलूट केली ती 300 धावांची…
उपखंडातील परिस्थिती पाहता फिरकी गोलंदाज निर्णायक भूमिका बजावतील आणि भारताच्या मुठीत निश्चितच एक मजबूत फिरकी मारा दडलाय. अनुभव व नवीन प्रतिभेचं मिश्रण असलेला हा विभाग भारताच्या बाजूने सामने वळविण्याची ताकद बाळगतोय…या गटात दीप्ती शर्मा व स्नेह राणा यासारख्या वरिष्ठ खेळाडूंचा अंतर्भाव. त्यांना साथ मिळेल ती राधा यादव नि उदयोन्मुख एन. श्रीचरणीची. श्रीचरणीची झेप ही भारतासाठीच्या सर्वांत सकारात्मक बाबींपैकी एक. आतापर्यंत फक्त आठ एकदिवसीय सामन्यांमध्ये तिनं 9 बळी घेतलेत ते 5.56 इकोनॉमी रेटसह…
अनुभवी नावांचा विचार करता राणा ही यंदाची भारताची उत्कृष्ट कामगिरी करणारी गोलंदाज. तिनं फक्त आठ डावांमध्ये 4.60 च्या उत्कृष्ट इकोनॉमी रेटनं 18 फलंदाजांना परतीची वाट दाखविलीय. यामध्ये तिनं एकदा चार, तर एकदा पाच खेळाडूंना गारद केलं…दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दीप्तीनं देखील या वर्षी 11 डावांमध्ये 4.55 च्या इकोनॉमी रेटनं 13 बळी घेतलेत. मधल्या षटकांमध्ये फलंदाजांना टिपण्याची त्यांची क्षमता संघासाठी महत्त्वपूर्ण ठरेल…असं असलं, तरी काही विश्लेषकांना वेगवान व फिरकी या दोन्ही विभागांमध्ये विविधतेचा अभाव दिसतो…
भारतीय संघास वेगाच्या जोरावर फलंदाजांना डगमगून टाकेल अशा वेगवान गोलंदाजांची कमतरता भासू शकते. रेणुका सिंह ठाकूर आणि क्रांती गौडच्या रुपानं नवीन चेंडू हाताळणारी चांगली दुक्कल पदरी आहे. त्या चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतात अन् डावाच्या सुऊवातीच्या टप्प्यात प्रतिस्पर्ध्यांना तडाखा देण्याची ताकदही बाळगतात…अऊंधती रे•ाrनं बेमालूमपणे संथ चेंडू सोडण्याची कला चांगली अवगत केलीय. त्यामुळं मधल्या षटकांचा विचार करता ती एक सोयीस्कर पर्याय ठरते. तथापि यापैकी कोणीही सातत्यानं भन्नाट वेगानं गोलंदाजी करू शकत नाही. भारतीय वातावरणात चेंडू कमीच स्विंग होतो. अशा परिस्थितीत मजबूत फलंदाजी असलेल्या संघांना त्यांचा सामना करणं सोपं जाऊ शकतं तसंच ‘डेथ ओव्हर्स’मध्ये आव्हानं उभी राहू शकतात…
फिरकीत दीप्ती व राणा या दोघीही उजव्या हातानं ऑफस्पिन टाकणाऱ्या, तर श्रीचरणी नि राधा डावखुऱ्या पारंपरिक गोलंदाज. या पार्श्वभूमीवर लेगस्पिनरची अनुपस्थिती संघाला जाणवू शकते…खरं तर भारताकडे राखीव खेळाडूंमध्ये प्रिया मिश्रा व प्रेमा रावत या दोन लेगस्पिनर आहेत. त्यापैकी किमान एकाचा मुख्य संघात समावेश केल्यास कर्णधार हरमनप्रीत कौरला अधिक पर्याय हाताशी मिळाले असते…
हा विश्वचषक म्हणजे हरलीन देओल, श्रीचरणी व अष्टपैलू अमनज्योत कौरसारख्या खेळाडूंच्या दृष्टीनं उत्तम संधी. ‘टीम इंडिया’च्या व्यवस्थापनानं हरलीनला खूप पाठिंबा दिलाय आणि महत्त्वाच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळवून तिच्यावर विश्वास दाखविलाय. गुडघ्याच्या दुखापतीमुळं यास्तिका भाटिया स्पर्धेतून बाहेर पडल्यानं हरलीनच तिसऱ्या क्रमांकाची फलंदाज असेल हे जवळपास निश्चित झालंय. अलीकडच्या काळात तिनं काही वेळा चांगली कामगिरी करून दाखविलेली असून 16 डावांमध्ये 584 धावा केल्याहेत. मात्र तिला विशीतील व तिशीतील धावसंख्येचं मोठ्या डावात रुपांतर करावं लागेल…
भारतीय खेळाडूंनी विश्वचषकाची तयारी जोरात केलीय. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघ यावर्षी चार एकदिवसीय मालिका खेळलाय. त्यात तिरंगी मालिका देखील समाविष्ट. यामुळं संघाला सामन्यांचा सराव, विविध परिस्थितींचा अनुभव आणि विश्वचषकापूर्वी संघरचना सुधारण्याची संधी मिळालीय तसंच खेळाडूंचा आत्मविश्वास वाढलाय…आपण आयर्लंड नि इंग्लंडविऊद्धची मालिका तसंच श्रीलंकेला हरवून तिरंगी मालिकाही खिशात टाकली…संघानं गतविजेत्या ऑस्ट्रेलियाविऊद्धची तीन सामन्यांची मालिका नुकतीच 1-2 अशी गमावलेली असली, तरी जोरदार टक्कर दिली अन् दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कागारुंची 13 सामन्यांची विजयी मालिका खंडित केली याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही…
हरमनप्रीतच्या संघाचा उत्साह वाढविणारी बाब म्हणजे भारत विश्वचषक परदेशात नव्हे, तर मायदेशी खेळतोय. त्यामुळं त्यांना परिचित खेळपट्ट्या, हवामानाची परिस्थिती आणि घरच्या मैदानावर जोरदार पाठिंबा मिळेल. भारताला घरच्या मैदानावर ही प्रतिष्ठित स्पर्धा खेळण्याची संधी मिळालीय ती 12 वर्षांनंतर…यापूर्वी मायदेशातील एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकात भारतानं बजावलेली सर्वोत्तम कामगिरी म्हणजे 1997 साली गाठलेली उपांत्य फेरी. तिथं त्यांना शेवटी विजेत्या ठरलेल्या ऑस्ट्रेलियाकडून 19 धावांनी पराभव पत्करावा लागला…यावेळी भारताला आपलं जगज्जेतेपदाचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नामी संधी चालून आलीय. मात्र त्यांच्यासमोर सर्वांत मोठे अडथळे असतील ते न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड नि ऑस्ट्रेलियाचे !
– राजू प्रभू









