म्हापसा : विश्व हिंदू परिषद-बजरंग दल गोमंतक शौर्ययात्रा भव्य मिरवणुकीचे म्हापसा बोडगेश्वर मंदिराजवळ लोकसभेचे नेते सदानंद शेट तानावडे व मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ढोल-ताशांच्या गजरात व हजारोंच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.शिवराज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण होत असून विश्व हिंदू परिषद 60 वर्षे पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी श्री बोडगेश्वर मंदिरपासून म्हापसा टॅक्सी स्थानकापर्यंत भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवकालीन वेषभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बाल कलाकारांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. हिंदू धर्म रक्षणाच्या कार्यात मोठ्या संख्येने हिंदू बांधव तसेच हिंदू प्रेमी सहभागी झाले होते. त्यानंतर अखिल भारतीय बजरंग दलाचे संयोजक नीरजजी दोनेरिया यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा झाली.
म्हापसा गांधी चौकाजवळ स्वराज गोमंतकतर्फे अखंड हिंदुस्तानच्या नामफलकाचे मंत्री सुभाष फळदेसाइं व सदानंद तानावडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत स्वराज्य गोमंतक आगळेवेगळे कार्यक्रम प्रशांत वाळके, अमेय नाटेकर, जयेश थळी आदींच्या नेतृत्वाखाली करीत असता ते अभिनंदनास पात्र आहेत. बाल कलाकार व वयोवृद्ध या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. आपण शिवप्रेमींना शुभेच्छा व्यक्त करतो, असे तानावडे म्हणाले. अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्य शोभायात्रेला आज हजारो शिवप्रेमी उपस्थित होते. स्वराज गोमंतकने म्हापशात एक आगळावेगळा बॅनर तयार केला आहे. अखंड हिंदूस्तान असे नामकरण करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे प्रेरणास्थान आहेत. महाराजांचा पराक्रम सर्वांना माहित आहे. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी सदैव पुढाकार घेऊन एक चांगले प्रशासन दिले. ते आमचे आराध्य दैवत आहे, असे ते म्हणाले.









