शिवचरित्रावर सौरभ करांडे यांचे व्याख्यान : प्रेरणामंत्राने दौडची सांगता
खानापूर : शहरात दुर्गामाता दौडीला नवव्या दिवशी युवा, युवतींचा, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा मोठा सहभाग होता. दौडीमुळे शहरासह ग्रामीण भागात शिवमय वातावरण बनले असून गावोगावी दौडीच्या निमित्ताने गावातून देवांचा जागर सुरू आहे. रोज पहाटे 5.30 पासून 8 पर्यंत भक्तिमय वातावरण निर्माण होत आहे. नवव्या दिवशीच्या दौडीच्या निमित्ताने शिवस्मारक येथील छत्रपती शिवरायांचे पूजन बरगाव ग्रा. पं. अध्यक्षा चांगुणा पाटील, नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी यांच्या हस्ते करण्यात आली. दौडीच्या ध्वजाचे पूजन गुंडू तोपिनकट्टी यांच्या हस्ते झाल्यानंतर दौडीला प्रारंभ झाला.
पुष्पवर्षाव-फटाक्यांची आतषबाजी
दौड शिवस्मारक येथून बुरुड गल्ली, कडोलकर गल्ली येथून पारिश्वाड क्रॉस मार्गे कुप्पटगिरी येथे प्रस्थान झाली. कुप्पटगिरी ग्रामस्थांनी दौडीचे भव्य स्वागत केले. पुष्पवर्षाव आणि फटावक्यांच्या आतषबाजीत दौडीचे स्वागत करण्यात आले. गावातील सर्व रस्ते रांगोळ्यांनी सजवले होते. भगव्या पताका, तोरण आणि कमानी उभारण्यात आल्या होत्या. महिला आणि युवा वर्गानी दौडीचे जागोजागी स्वागत केले. यानंतर विठ्ठल मंदिर आवारात दौड आल्यावर या ठिकाणी शिव व्याख्याते सौरभ करांडे यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले. यानंतर प्रेरणामंत्राने दौडीची सांगता झाली.









