संपूर्ण गाव दोन दिवस भगवेमय : ‘राजं आलं, राजं आलं…’ या गाण्याचे बोल प्रत्येकाच्या तोंडी : आगमन सोहळा उत्साहात

वार्ताहर /किणये
गावातील प्रत्येक गल्लीमध्ये भगव्या पताका, शिवभक्तांच्या डोक्यावर भगवे फेटे, मुखी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा आणि प्रत्येकाच्या मोबाईल आणि डिजे साऊंड सिस्टीमवर पावनखिंड या मराठी चित्रपटातील गाजलेले गाणे ‘राजं आलं, राजं आलं…’ हेच दृश्य किणये गावात दोन दिवस दिसून आले. गावातील तरुण, तरुणी, शिवभक्त आणि ग्रामस्थ यांच्यावतीने गावात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. यासाठी बरेच परिश्रम, गावात एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न झाले. अन् शिवरायांच्या मूर्तीसाठी संपूर्ण ग्रामस्थ एकवटले आणि मूर्ती उभारण्याचे काम सुरू झाले.
गाव तसं मोठं पण राजकीय भेदभाव बाजूला ठेवून आपल्या गावात शिवरायांची मूर्ती उभारायलाच हवी, अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा झाली. अन् त्यामुळेच अनेकवेळा गावकऱयांच्या बैठका झाल्या. चौथऱयाच्या कामकाजाला सुरुवात झाली. मूर्ती बनविण्यासाठी सांगितले. गावात एक वेगळेच नवचैतन्य निर्माण झाले.
गावकऱयांच्या मागणीनुसार अनगोळ येथील विक्रम पाटील यांनी 12 फुटी पंचधातुतील छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती बनविली.
शिवरायांच्या मूर्तीला पाहून सारेजण अगदी नतमस्तक झाले. ही ताकद केवळ शिवरायांमध्येच आहे, हेच जाणवले. शिवरायांच्या मूर्तीचा आगमन सोहळा शनिवार व रविवार असे दोन दिवस आयोजित करण्यात आला. पहिल्या दिवशी अनगोळ येथून मूर्ती आणून पिरनवाडीतून मिरवणुकीला सुरुवात केली. शनिवारी रात्री किणये गावात मिरवणूक पोहोचली. रविवारी सकाळी 10 नंतर गणेश मंदिर येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. रमेश नाईक यांनी मिरवणूक गाडय़ाचे पूजन केले. गावातील प्रत्येक गल्लीमध्ये मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गुलाल व भंडाऱयाची उधळण करण्यात आली.
गावावर शिवरायांची कृपा
किणये गावात शिवरायांच्या मूर्तीची मिरवणूक अगदी जल्लोषात सुरू होती. दुपारी ही मिरवणूक विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ आली. त्याच वेळी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱयांचा पाऊस सुरू झाला. काहीजण विठ्ठल-रखुमाई मंदिरात आले व काही भक्त मिरवणुकीतच होते. विजेचा कडकडाट झाला. अन् आकाशातून वीज कोसळली, ती थेट किणये गावावर. आवाजाने क्षणभर सारेजण भयभीत झाले. ती वीज किणयेतील विठ्ठल-रखुमाई मंदिराच्या कळसावर कोसळल्याने कळसाचा काही भाग उखडून गेला. मात्र, देवाने आम्हा गावकऱयांची रक्षा केली, याची अनुभूती किणये गावकऱयांना आल्याने सारेजण भावूक होऊन बोलू लागले.









