संकेश्वरात वातावरण भगवेमय : ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष
प्रतिनिधी / संकेश्वर
रयतेच्या राजाला मानवंदना देण्यासाठी जमलेले हजारो शिवप्रेमी, हत्ती-घोड्यांसह पालखी, सनई-चौघडे, करडी-धनगरी ढोल, झांजपथक-लेझीम, दांडपट्टा, गोंधळी अशा पारंपरिक लवाजम्यासह पार पडलेली मिरवणूक, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी या घोषणांचा चाललेला अखंड जागर, भगवे फेटे परिधान केलेल्या महिलांचा मोठा सहभाग अशा उत्साही आणि जल्लोषी वातावरणात संकेश्वरात गुऊवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वाऊढ पुतळ्याची मिरवणूक पार पडली. यावेळी विविध मान्यवरांसह शिवप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीने वातावरण भगवेमय झाल्याचे दिसून आले.
प्रारंभी सकाळी 11 वाजता येथील जगद्गुऊ श्री शंकराचार्य संस्थान मठासमोर सच्चिदानंद अभिनव विद्या नृसिंह भारती स्वामीजांनी मिरवणुकीला चालना दिली. शहरातील प्रमुख मार्गांवरून पार पडलेल्या या मिरवणुकीचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत होत होते. यावेळी महिलांनी भगव्या साड्या, फेटे तर पुऊषांनी पांढरे कुर्ते, भगव्या टोप्या अशी वेशभूषा केली होती. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, सईबाई, छत्रपती संभाजीराजे यांचे सजीव देखावे साकारण्यात आले होते.
शिवपुतळ्यावर आकर्षक पुष्पवृष्टी केली जात होती. मुख्य मार्गाच्या दुतर्फा लावण्यात आलेले फलक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते. उन्हाच्या तीव्र झळा बसत असतानाही शिवप्रेमींचा उत्साह जराही कमी झाल्याचे दिसत नव्हते. या मिरवणुकीत सकल मराठा समाजासह सर्व जाती-धर्माचे नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सायंकाळी 5 वाजता शिवाजी चौकात मिरवणुकीची सांगता झाली.
यावेळी आयोजित महाप्रसादाचा 10 हजारांवर शिवप्रेमींनी लाभ घेतला. या मिरवणुकीत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती, हिरा शुगरचे अध्यक्ष निखिल कत्ती, वीरशैव समाजाचे आप्पासाहेब शिरकोळी, नगराध्यक्षा सीमा हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनील पर्वतराव, जयप्रकाश सावंत, संगम साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, हुक्केरी वीज संघाचे संचालक शशिराज पाटील, नगरसेवक शिवानंद मुडशी, संजय शिरकोळी, उद्योजक अभिजीत कुरणकर, छत्रपती शिवाजी महाराज सेवा संघाचे अध्यक्ष श्रीकांत हतनुरी, उपाध्यक्ष अमर नलवडे यांच्यासह शहर व परिसरातील हजारो शिवप्रेमी उपस्थित होते.









