घटस्थापनेच्या मुहूर्तावर मूर्तीची प्रतिष्ठापना : शिवरायांचा आदर्श तरुण पिढीने घेणे गरजेचे
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिजाऊ माता की जय, जय भवानी जय शिवाजी…’ अशा शिवगर्जनेत आणि शिवमय वातावरणात अलतगा येथील शिवशक्ती युवक मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्यातून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती घटस्थापनेच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात आणण्यात आली. काकती येथील कारागीर सुमीत पाटील यांनी ही मूर्ती तयार केली आहे. त्यांच्या निवासस्थानापासून मिरवणुकीने मूर्ती अलतगा वेशीपर्यंत आणण्यात आली. यावेळी निवृत्त जवान बाळू देवाप्पा पाटील यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करण्यात आले. डॉल्बी व विद्युत रोषणाईच्या आकर्षक प्रकाशामध्ये संपूर्ण गावभर मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. रात्री 10 वाजता श्रीराम मंदिरजवळ मूर्ती आल्यावर मिरवणुकीची सांगता करण्यात आली.
मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवस्थान पंच अनिल पावशे होते. प्रमुख वक्ते म्हणून देवस्थान पंच कमिटी अध्यक्ष चंद्रकांत धुडूम होते. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, विक्रम चौगुले उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून प्रतिष्ठापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आजच्या राज्यकर्त्यांनी तसेच तरूण पिढीने अंगीकृत करून जीवनात वाटचाल करणे गरजेचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आम्ही आज हिंदू म्हणून गर्वाने जगत आहोत, असे मनोगत अध्यक्षपदावरून बोलताना चंद्रकांत धुडूम यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवशक्ती युवक मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी बरेच परिश्रम घेतले. सूत्रसंचालन कल्लाप्पा चौगुले यांनी केले. महेश दळवी यांनी आभार मानले.









