खानापूर : खानापूर तालुक्यातील खैरवाड येथील छत्रपती शिवाजी सेवा संघाच्यावतीने भव्य शिवस्मारक निर्माण करण्यात आले आहे. शिवस्मारकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती प्रतिष्ठापित करण्यात येणार आहे. यासाठी कोल्हापूर येथील कारागीर संकपाळ यांच्याकडून पंचधातूची सिंहासनारुढ भव्य शिवमूर्ती तयार केली आहे. या मूर्तीची खानापूर येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी झांजपथक, कलश घेतलेल्या 108 सुवासिनी तसेच विठूरायाची पालखी, भजनी मंडळ यामुळे खानापुरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते. खैरवाड येथे मंगळवार दि. 6 रोजी स्मारकाची वास्तुशांती, होमहवन, शनिवारी 10 जून रोजी प्रतिष्ठापना व उद्घाटन होणार आहे. खैरवाड येथे नव्याने स्थापित करण्यात येत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे खानापुरात जंगी स्वागत करण्यात आले. रविवारी कोल्हापूर येथून आणलेल्या शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे येथील बसवेश्वर चौकात पूजन करण्यात आले. माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी मिरवणुकीला चालना दिली. यानंतर ढोलताशाच्या निनादात सवाद्य मिरवणूक निघाली. खैरवाड येथील सुवासिनी कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. युवकांनी शिवकालीन वेशभूषा केली होती. ‘जय भवानी जय शिवाजी’च्या जयघोषात तसेच ढोलताशांच्या निनादात खानापुरातून ही मिरवणूक काढण्यात आली. शिवस्मारक चौकात माजी आमदार दिगंबर पाटील यांनी शिवरायांच्या मूर्तीचे पूजन केले. यावेळी आबासाहेब दळवी, प्रकाश चव्हाणसह मान्यवर मंडळी उपस्थित होती.
त्यानंतर मूर्तीचे नंदगडकडे प्रस्थान झाले. रुमेवाडी क्रॉस येथे शिवप्रेमींनी स्वागत केले. खानापूर ते नंदगड मार्गावर अनेक गावांतील शिवप्रेमींनी मूर्तीचे पुष्पहार घालून व महिला भगिनींनी आरती ओवाळून स्वागत केले. सायंकाळी 5 वा. नंदगड बाजारपेठेतून संगोळ्ळी रायण्णा स्मारकापर्यंत जल्लोषी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीत शिवप्रेमी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला होता. या स्मारकास माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर 5 लाख रुपये, आमदार विठ्ठल हलगेकर 50,000 रु., शिवाजी भजनी मंडळ खैरवाड 55,555 रु., गणपती गुरव 31,000 रु., यल्लारी कंग्राळकर 51,000 रु., अंकुश सुतार 25,000 रु., चंद्रकांत सुतार 25,000 रु., मष्णू सुतार 25,000 रु., परशराम भुजगुरव 21,000 रु., शिवाजी पाटील 21,000 रु., माजी आमदार दिगंबर पाटील 19,000 रु. आदींनी आर्थिक सहकार्य केले. स्मारक कमिटीचे अध्यक्ष रुक्माण्णा झुंजवाडकर, उपाध्यक्ष परशराम बावकर, खजिनदार प्रेमानंद भुजगुरव, सेक्रेटरी विनोद मिटकर, परशराम भुजगुरव, परशराम असोगेकर, परशराम कंग्राळकर, जोतिबा वाकाले, परशराम कोलेकर, लखन मंडोळकर, प्रवीण कोलेकर आदी सदस्यांनी स्मारकासाठी प्रयत्न केले.









