3 ते 14 जानेवारीदरम्यान अंगडी कॉलेजच्या ग्राऊंडवर आयोजन : दिल्ली, राजस्थान, मुंबई, पुणे, कोल्हापूर येथील स्टॉल दाखल होणार
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित, ‘अन्नोत्सव-2025’ची मुहुर्तमेढ रविवारी दिमाखात पार पडली. 3 ते 14 जानेवारीदरम्यान अंगडी कॉलेज मैदान, नानावाडी येथे अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. इव्हेंट चेअरमन शैलेश मांगले व अक्षय कुलकर्णी यांच्या हस्ते मुहुर्तमेढ रोवण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रोटरी अन्नोत्सव या खाद्यपदार्थांच्या भव्य प्रदर्शनाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ बेळगावने केले आहे. यावर्षी अन्नोत्सवाचे 28 वे वर्ष आहे. प्रदर्शनामध्ये 114 फुड स्टॉल असून त्यापैकी 73 शाकाहारी स्टॉल्स असणार आहेत. उर्वरित स्टॉल्स मांसाहारी असतील. त्याचबरोबर 72 स्टॉल्स गृहोपयोगी साहित्य, वस्तू व कपड्यांचे असणार आहेत.
यावर्षी दिल्ली, राजस्थान, मुंबई, पुणे, कोल्हापूर तसेच उत्तर कर्नाटकातील स्टॉलधारक आपले नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ घेऊन अन्नोत्सवामध्ये दाखल होणार असल्याचे अध्यक्ष सुहास चांडक यांनी सांगितले. अन्नोत्सवामध्ये यावर्षी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. डान्स, फॅशन शो या स्पर्धांसोबत मिस्टर बेळगाव ही स्पर्धादेखील भरविली जाणार आहे. अंगडी कॉलेजच्या प्रशस्त मैदानावर यावर्षी अन्नोत्सव होणार आहे. 400 ते 500 चार चाकी व 1500 हून अधिक दुचाकी पार्किंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक मान्यवर गायक कार्यक्रमामध्ये सहभागी होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मुहुर्तमेढप्रसंगी सेक्रेटरी मनीषा हेरेकर, प्रताप नलावडे, तुषार पाटील, मनोज पै, दीपन शहा यांच्यासह रोटरी क्लब ऑफ बेळगाव, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बेळगावचे सदस्य उपस्थित होते.
महोत्सवातून सामाजिक कार्याला प्राधान्य
रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यातून मिळणाऱ्या निधीचा वापर सामाजिक कार्यासाठी केला जाणार आहे. गावागावात जाऊन दंततपासणी करण्यासाठी एक डेंटल व्हॅन तसेच डोळ्यांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याचबरोबर सांडपाणी प्रकल्प उभारण्याचा विचार रोटरीकडून केला जात असल्याचे सांगण्यात आले.









