गुरुवारी उद्घाटन, 300 कक्ष, 12 मजली वास्तू
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भव्य आणि अत्याधुनिक कार्यालयाचे निर्माणकार्य दिल्लीत करण्यात आले आहे. देशभरातील संघस्वयंसेवक आणि संघाचे समर्थक यांच्या आर्थिक योगदानातून हे भव्य संकुल साकारले आहे. यासाठी 150 कोटी रुपयांचा खर्च आला असून 12 मजली असणाऱ्या या संकुलात 300 सुसज्ज कक्ष आहेत. 3.75 एकर भूखंडावर या वास्तूचे निर्माणकार्य करण्यात आले आहे. या कार्यालयाचे नाव ‘केशव कुंज’ असे असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापन डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. गुरुवारी या कार्यालयाची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रसिद्ध करण्यात आली. हे वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. या पार्श्वभूमीवर या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. संघाचे राष्ट्रीय मुख्यालय महाराष्ट्रातील नागपूर येथे आहे. या संघटनेची स्थापना 1925 मध्ये दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली होती. यावर्षी दसऱ्यादिवशी संघाला तीथीनुसार 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. शताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी संघाने पूर्ण सज्जता केली आहे.
75 सहस्रांचे योगदान
या भव्य आणि शानदार कार्यालयाच्या निर्मितीसाठी संघाने आपले स्वयंसेवक आणि समर्थक यांच्याकडूनच आर्थिक योगदान स्वीकारले आहे. अशा 75 हजारांहून अधिकांनी या वास्तूच्या निर्मितीसाठी शुल्काच्या स्वरुपात अर्थसाहाय्य केले आहे, अशी माहिती संघाकडून देण्यात आली. या संकुलाच्या रचनेत पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही शैलींचा संगम पहावयास मिळत आहे.
तीन मनोऱ्यांची निर्मिती
या संकुलात साधना, प्रेरणा आणि अर्चना अशी नावे असणाऱ्या तीन मनोऱ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. संघाचे कार्यालय, अनेक उपकार्यालये, निवासी सदनिका, भव्य सभागृहे, आहार कक्ष अशा विविध सोयी या संकुलात आहेत. साधना नामक मनोऱ्यात संघ व्यवस्थापनाचे कार्यालय असून प्रेरणा आणि अर्चना या मनोऱ्यांमध्ये संघ कार्यकर्ते आणि अधिकारी यांच्या निवासाची सुविधा आहे.
अनूप दवे यांची रचना
गुजरातमधील विख्यात वास्तुआरेखनकार (आर्किटेक्ट) अनूप दवे यांनी या संकुलाचे आरेखन केले असून त्यांनी या संकुलात पारंपरिक वास्तूशैली आणि आधुनिक सोयी असा संगम घडवून आणला आहे. राजस्थानी आणि गुजरातील पारंपरिक शैलीसदृश कोरीव काम असणाऱ्या खिडक्यांच्या चौकटी या वास्तूत असून वृक्षतोड करावी लागू नये, म्हणून लाकडाचा उपयोग टाळण्यात आला आहे.
तीन सभागृहे, रुग्णालयही
या संकुलात आधुनिक सोयींनी युक्त अशी तीन सभागृहे असून त्यांची एकत्रित आसन क्षमता 1,300 इतकी आहे. तसेच या वास्तूत 5 बेडस्चे एक सुसज्ज रुग्णालयाही आहे. येथे एक औषधोपचार केंद्रही असून 100 जण एकावेळी जेवू शकतील, असा मोठा आहार कक्षही निर्माण करण्यात आला आहे. संघाचे अधिकारी आणि सामान्य कार्यकर्त्यांनाही या सुविधांचा लाभ मिळणार आहे. एका सभागृहाला विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांचे नाव देण्यात आले आहे. सिंघल हे रामजन्मभूमी आंदोलनाचे महत्वाचे नेते होते.
शाखांसाठी मोठी जागा
संकुलाच्या मध्यभागी हरित स्थान असून तेथे संघाच्या प्रात:शाखा घेण्याची सुविधा आहे. प्रेरणा आणि अर्चना या वास्तूंमधील जागा सामाजिक सभा आणि संघटनात्मक कार्यक्रमांसाठी उपयोगात आणण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रवेश दिल्लीत 1939 मध्ये झाला होता. नव्या कार्यालय वास्तूच्या नजीकच दिल्लीतील प्रथम कार्यालयाची वास्तू होती, अशीही माहिती देण्यात आली.









