संध्या तेरसे यांची पत्रकार परिषदेत माहिती
वार्ताहर / कुडाळ
आपली हिंदू संस्कृती, सण परंपरांचे संवर्धन करणे, हे भारतीय जनता पार्टीचे ध्येय आहे. नवीन लग्न झालेली स्त्री, सुवासिनी व्रत करते, त्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विश्वगुरु या पदावर नेण्याचे व्रत केले आहे. त्या व्रताला एकत्रित साथ देण्यासाठी महिलांसाठी भारतीय जनता पार्टीचे भाजप नेते माजी खासदार निलेश राणे पुरस्कृत भव्य मंगळागौर स्पर्धा 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता कुडाळ येथील भाजप कार्यालया समोरील पटांगणावर आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत कुडाळ – मालवण मतदार संघातून 14 संघ सहभागी झाले होते. त्यापैकी नऊ संघाची निवड फेरीत मंगळागौर स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अशी माहिती भाजप जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा संध्या तेरसे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
या स्पर्धेचे उदघाटन नीलम राणे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख पाहुणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, भाजप जिल्ह्याध्यक्ष प्रभाकर सावंत उपस्थित राहणार आहेत. प्रमुख उपस्थिती उद्योजक दत्ता सामंत, तालुका अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, उपाध्यक्ष रणजित देसाई, ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
कुडाळ-एमआयडीसी येथील विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी ही माहीती दिली.यावेळी महिला तालुकाध्यक्षा आरती पाटील, पिंगुळी शहरअध्यक्षा साधना माडये, शहर उपाध्यक्षा विशाखा कुलकर्णी, जिल्हा सरचिटणीस रेखा काणेकर, जिल्हा कार्यकारणी सदस्या आदिती सावंत, शहर सरचिटणीस अक्षता कुडाळकर, कार्यक्रम संयोजिका प्रज्ञा राणे, जिल्हा कार्यकारणी सदस्या साक्षी सावंत उपस्थित होत्या.
मंगळागौरव स्पर्धेसाठी पारितोषिके : प्रथम क्रमांक 21हजार रुपये, द्वितीय क्रमांक १५ हजार, तृतीय क्रमांक १० हजार रुपये व विजेत्यांना चषक देण्यात येणार आहेत. तसेच उत्तेजनार्थ दोन संघांना प्रत्येकी ३ हजार रुपये आणि चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच उर्वरित संघांना मानधन आणि प्रमाणपत्र देण्यात येईल. यावेळी लकी ड्रॉ, प्रश्नमंजुषा कार्यक्रम सुद्धा होणार आहेत. या मंगळागौर स्पर्धेसाठी कुडाळ-मालवण मतदारसंघातून ९ संघाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये सखी महिला संघ पावशी, भैरव-जोगेश्वरी महिला संघ कुडाळ, एकता महिला संघ तेंडोली, नवदुर्गा महिला संघ कुडाळ, धनलक्ष्मी महिला संघ आकेरी, सिद्धी गणपती संघ कवीलकट्टे, कुडाळेश्वर महिला संघ कुडाळ, सिद्धाई ग्रुप कुडाळ व भीमगर्जना महिला संघ पाट यांचा समावेश आहे, अशी माहिती संध्या तेरसे यांनी दिली.









