सर्वात मोठ्या अक्षरधाम मंदिराचे उद्घाटन : 185 एकर क्षेत्रात निर्मिती : 12 वर्षांत तयार
वृत्तसंस्था/ न्यू जर्सी
स्वामीनारायण अक्षरधाम या अमेरिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे औपचारिक उद्घाटन रविवार, 8 ऑक्टोबर रोजी न्यू जर्सी येथे करण्यात आले. हे मंदिर 183 एकर क्षेत्रात विस्तारलेले आहे. अमेरिकेतील तब्बल 12,500 हून अधिक स्वयंसेवकांनी या मंदिराच्या निर्मितीमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. या मंदिराची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. लोक त्याच्या डिझाइन आणि सौंदर्याची प्रशंसा करत आहेत.
जगातील सर्वात मोठे मंदिर अक्षरधाम भारतात आहे. या मंदिराची ख्याती भारतासह परदेशातही आहे. त्यानंतर आता अमेरिकेत अक्षरधाम मंदिर साकारण्यात आले आहे. न्यू जर्सीमध्ये बांधलेले हे हिंदू मंदिर उद्घाटनापूर्वीपासूनच चर्चेचा विषय बनले आहे. हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 12 वर्षे लागली. हे मंदिर 255 फूट लांब, 345 फूट रुंद आणि 191 फूट उंच असून 183 एकरात पसरलेले आहे. या मंदिराचे दरवाजे 18 ऑक्टोबर रोजी अभ्यागतांसाठी खुले होतील, असे मंदिर प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
न्यू जर्सी येथे साकारण्यात आलेले हे मंदिर रॉबिन्सविले या छोट्या गावात टाइम्स स्क्वेअर, न्यूयॉर्कच्या दक्षिणेस सुमारे 60 मैल (90 किमी) किंवा वॉशिंग्टन, डीसीच्या उत्तरेस सुमारे 180 मैल (289 किमी) स्थित आहे. अमेरिकेमधील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराची रचना प्राचीन भारतीय संस्कृतीनुसार काळजीपूर्वक केली गेली आहे. यात भारतीय वाद्ये आणि नृत्य प्रकार दर्शविणारी 10,000 हून अधिक शिल्पे आणि गुंतागुंतीच्या कोरीवकामांचा उल्लेखनीय संग्रह आहे. मंदिराच्या बांधकामासाठी चुनाखडी, ग्रॅनाइट, गुलाबी वाळूचा खडक आणि संगमरवरी दगडांसह अंदाजे दोन दशलक्ष घनफूट दगडांची आवश्यकता होती. हे दगड भारत, तुर्की, ग्रीस, इटली आणि चीनसह जगातील विविध भागांतून आणले गेले आहेत. ‘ब्रह्म कुंड’ हे मंदिराचे एक उल्लेखनीय वैशिष्ट्या असून त्यामध्ये जगभरातील 300 हून अधिक जलकुंभांतील पाण्याचा समावेश आहे.









