शेवटच्या दिवशी सरकारी सुटीमुळे प्रचंड गर्दी : स्टॉलधारकांकडून आयोजकांचे आभार
बेळगाव : मागील 12 दिवसांपासून खाद्यप्रेमींना देशभरातील चटपटीत खाद्यपदार्थ चाखण्याची संधी मिळालेल्या अन्नोत्सवाची मंगळवारी सांगता झाली. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने आयोजित अन्नोत्सव-2025 ला खवय्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. शेवटच्या दिवशी मकरसंक्रांत असूनदेखील सरकारी सुटीमुळे प्रचंड गर्दी झाली होती. सावगाव रोड येथील अंगडी कॉलेजच्या मैदानावर यावर्षीचा अन्नोत्सव भरविण्यात आला होता. मागील वर्षीपेक्षा यावर्षी भेट देणाऱ्यांची संख्या कमालीची वाढल्याने स्टॉलधारकांनी समाधान व्यक्त केले. बेळगावसह रत्नागिरी, मुंबई, पुणे, हुबळी, धारवाड, दिल्ली, राजस्थान, प. बंगाल, काश्मीर येथील एकापेक्षा एक सरस खाद्यपदार्थांचा आस्वाद खवय्यांनी घेतला. बेळगाव परिसरात भरणारा हा सर्वात मोठा उत्सव असल्याने आजुबाजूच्या जिल्ह्यांमधूनही खवय्यांची उपस्थिती होती. मंगळवारी अन्नोत्सवाची सांगता झाली. सुमधूर संगीताचा आस्वाद घेत खवय्यांनी खाद्यपदार्थांसाठी स्टॉलवर गर्दी केली होती. त्याचबरोबर लहान मुलांसाठी असलेल्या अॅम्युजमेंट पार्कला तुफान गर्दी पाहायला मिळाली. चांगला व्यवसाय झाल्याने स्टॉलधारकांनी आयोजकांचे आभार मानले. रोटरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा या निमित्ताने सत्कार करण्यात आला.









