टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो : सर्वसामान्यांना महागाईचे चटके : गृहिणींच्या दैनंदिन खर्चात भर
बेळगाव : कडधान्य, डाळींपाठोपाठ टोमॅटोच्या दरातही हळूहळू वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यात 15 ते 20 रुपये दराने मिळणारा टोमॅटो 30 ते 40 रुपये किलो झाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा चटका सहन करावा लागत आहे. दैनंदिन आहारात लागणाऱ्या वस्तूंच्या किमती वाढत असल्याने सर्वसामान्य गृहिणींचे कंबरडे मोडले आहे. यंदा पावसाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. त्यामुळे नवीन भाजीपाला लागवडही घटली आहे. कूपनलिका, विहिरी आणि जलाशयांच्या पाणी पातळीत घट झाल्याने भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांचे दर हळूहळू वाढू लागले आहेत. विशेषत: कांदाही 40 रुपयांवर स्थिर झाला आहे. तर टोमॅटो हळूहळू वाढत असून 40 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे दैनंदिन खर्चासाठी खिशाला कात्री लागत आहे. सहा महिन्यांपूर्वी टोमॅटो उत्पादनात भरमसाट वाढ झाली होती. दरम्यान, शेतकऱ्यांना दराअभावी टोमॅटो रस्त्यावर टाकावा लागला होता. मात्र, आता उत्पादनात घट झाल्याने पुन्हा टोमॅटोचे दर वधारले आहेत. येत्या काही दिवसांत पुन्हा टोमॅटो वाढेल, अशी माहितीही टोमॅटो विक्रेत्यांनी दिली आहे.
महागाईचा फटका
दैनंदिन आहारात लागणाऱ्या डाळी, कडधान्य, तांदूळ, ज्वारीच्या किमती भरमसाट वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना त्या खरेदी करणे असह्या होऊ लागले आहे. रोजच्या वाढत्या महागाईला तोंड देताना सर्वसामान्यांच्या नाकीनऊ येत आहे. त्यातच आहारातील महत्त्वाचा घटक असणाऱ्या टोमॅटोच्या दरातही वाढ झाल्याने गृहिणींच्या दैनंदिन खर्चात भर पडली आहे.









