आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली माहिती
जयसिंगपूर प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील उदगांव येथे जवळपास ११८ कोटी रुपये खर्चाचे शासकीय मनोरुग्णालय उभे राहावे यासाठीचा प्रस्ताव आपण शासनाकडे सादर केला होता.११ नोव्हेंबर २०२२ रोजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मंत्रालयातील दालनात झालेल्या बैठकीमध्ये
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी उदगांव येथे मनोरुग्णालय उभारण्यास बैठकीत तत्त्वता मान्यता दिली होती, मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील या रुग्णालयास मंजुरी देण्यात आली होती. याचाच भाग म्हणून नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या रुग्णालयासाठी ११८ कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली गेल्याने लवकरच उदगांव येथील शासनाच्या प्रशस्त जागेत शासकीय मनोरुग्णालयाच्या उभारणीला सुरुवात होईल अशी माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या सहकार्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या पुण्यानंतर कोणत्याच जिल्ह्यामध्ये शासकीय मनोरुग्णालय नाही, कोकणात रत्नागिरी येथे सध्या शासकीय मनोरुग्णालय आहे. पण सदर रुग्णालय रत्नागिरी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. तसेच सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमधील रुग्णांची मोठी गैरसोय होत होती.
यावेळी बोलताना माजी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र वड्रावकर म्हणाले, “आरोग्य राज्यमंत्री असताना कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये शासकीय मनोरुग्णालय व्हावे यासाठी मी सातत्याने आग्रही होतो. शिरोळ तालुक्यातील उदगांव येथे असलेल्या शासकीय जमिनीवर जवळपास ११८ कोटी रुपये खर्चाच्या मनोरुग्णालय उभारण्या साठीचा प्रस्ताव देखील आपण सादर केला होता, या प्रस्तावा बाबत आरोग्य मंत्री नामदार तानाजी सावंत यांच्या सोबत सविस्तर चर्चा झाली होती, आणि नामदार सावंत यांनी या बैठकीत शासकीय मनोरुग्णालय उभारण्यासाठी तत्वता मान्यता ही दिली होती, उदगांव येथे होणाऱ्या या शासकीय मनोरुग्णालयाचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांमधील रुग्णांना होणार आहे.” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
पुढे बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले कि, “ज्या परिवारामध्ये मनोरुग्ण असतो त्या परिवाराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. खाजगी रुग्णालयामधील मनोरुग्णांवरील उपचार सर्वसामान्यांना परवडण्याजोगे नसतात आणि जवळपास शासकीय मनोरुग्णालय नसल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबाची मोठी परवड होत असते. कोल्हापूरात मनोरुग्णालय व्हावे अशी जनतेतून होणारी मागणी ध्यानात घेऊन आपण मागील दोन वर्षे सातत्याने यासाठी पाठपुरावा केला. ठाणे नंतर उदगांव येथे शासकीय रुग्णालय होत असल्याने सामान्य रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे” असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी म्हटले आहे.









