अन्नोत्सवात पाचव्या दिवशीही खवय्यांची गर्दी
बेळगाव : बेळगावच्या आठवडी बाजाराला मंगळवारी सुटी असल्याने रोटरी अन्नोत्सवात मोठी गर्दी पाहायला मिळाली. सुफी गाण्यांसोबत चटपटीत खाद्यपदार्थांचा मनमुराद आनंद लुटण्यात आला. गुलाबी थंडीमध्ये देशभरातील खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता आल्याने अन्नोत्सवात पाचव्या दिवशीही गर्दी होती. रोटरी क्लब ऑफ बेळगावतर्फे सीपीएड मैदानावर रोटरी अन्नोत्सवचे आयोजन केले आहे. खाद्य पदार्थांसोबतच गृहोपयोगी वस्तू खरेदीकडे नागरिकांची पसंती आहे. राजस्थानी दालबाटी व कचोरी खाण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे. शाकाहारीसोबत मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोकणी पद्धतीचा वडा-केंबडा महाराष्ट्रातील देवरुख येथील स्टॉलधारकांनी उपलब्ध करून दिला आहे. बेळगावच्या खाद्यप्रेमींना ही एक पर्वणी ठरत आहे. अन्नोत्सवासाठी येणाऱ्या नागरिकांना मोफत पार्किंग व्यवस्था उपलब्ध केली आहे. 800 चार चाकी वाहने थांबतील अशा पद्धतीने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज सायंकाळी अन्नोत्सवमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मंगळवारी सादर करण्यात आलेल्या सुफी गाण्यांसोबत खवय्यांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. बुधवार दि. 10 रोजी बॉलिवूड रेट्रो नाईट्स हा संगीत कार्यक्रम होणार आहे.









