बांदा प्रतिनिधी
निगुडे – येथे आज सकाळी ०९:३० च्या दरम्यान सोनुर्ली येथून खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरने गावातील शेतकरी पांडुरंग बाळा गावडे यांच्या बकरीला शेतात नेत असताना धडक दिली . या धडकेत ती जागीच ठार झाली .यात शेतकरी गावडे यांचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. निगुडे- सोनुर्ली महामार्गावर सोनुर्ली येथील दगड खाणींवरून अवैधरित्या खनिज वाहतूक निगुडे गावातून दिवसाढवळ्या होत आहे . ३० ते ४० डंपर इथून जातात.आणि हे डंपर एवढ्या भरधाव वेगाने धावतात की समोर कोण आहे हेही डंपर चालक पाहत नाहीत. यासंदर्भात निगुडे पोलीस पाटील सुचिता मयेकर, ग्रामपंचायत सदस्य समीर गावडे, व महेश गावडे यांनी पंचयादी केली. रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक लोकांना याचा त्रास सहन करावा लागतो. उपप्रादेशिक परिवहन, महसूल विभाग आणि जिल्हा खनिकर्म यांच्या आशीर्वादाने सदर वाहतूक होत असल्याचा ग्रामस्थांचं म्हणणं आहे . आज या ठिकाणी एका पाळीव प्राण्याचा बळी गेला. भविष्यात या ठिकाणी जर जीवितहानी झाल्यास संबंधित अधिकारी जबाबदार राहतील. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासंदर्भात योग्य ती दखल घेऊन ज्या खाणींवरून ही वाहतूक होते. त्या खाणींचे परवाने कायमस्वरूपी रद्द करा . अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशाराही निगुडे ग्रामस्थांनी दिला आहे.









