भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव विसर्जन : तब्बल 30 तास निघाली मिरवणूक
बेळगाव : वैभवशाली परंपरा लाभलेल्या बेळगावची गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक मोठ्या भक्तिमय व जल्लोषी वातावरणात काढण्यात आली. ही मिरवणूक तब्बल 30 तास चालली. मनपाच्या गणेशमूर्तीचे सर्वात शेवटी शुक्रवारी रात्री 10.45 वा. विसर्जन करण्यात आले. बाप्पांना निरोप देताना ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष सुरू होता. ढोल-ताशे, बॅण्ड, टाळमृदंग व डीजेच्या तालावर उत्साहाने शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींची विसर्जन मिरवणूक पार पडली. या मिरवणुकीमध्ये तरुणांसह तरुणी आणि आबालवृद्धांचाही सहभाग होता. तरुणाई डीजेच्या तालावर थिरकत होती. एकूणच अमाप उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक पार पडली.
हुतात्मा चौक येथे गुरुवारी सायंकाळी 5 वाजता संयुक्त महाराष्ट्र चौकातील मानाच्या गणेशमूर्तीचे पूजन महापौर शोभा सोमणाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, उत्तरचे आमदार राजू सेठ, खासदार मंगला अंगडी, माजी आमदार अनिल बेनके, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विविध मान्यवरांच्या हस्ते ढोल वाजवून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीमध्ये केवळ पाच गणेशोत्सव मंडळांनी तातडीने सहभाग दर्शविला. हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, संयुक्त महाराष्ट्र चौक, समादेवी गल्ली, यंदे खूट, कॉलेज रोड, धर्मवीर संभाजी चौक, किर्लोस्कर रोड, टिळक चौक, रामलिंगखिंड गल्ली, हेमूकलानी चौक, शनिमंदिर, कपिलेश्वर उ•ाणपूलमार्गे कपिलेश्वर विसर्जन तलावापर्यंत ही मिरवणूक काढली. त्याठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
सायंकाळी 5 वाजता सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीला सुरुवात झाली तरी शहरातील गणेशोत्सव मंडळांनी मिरवणुकीमध्ये उशिराने आपला सहभाग दर्शविला. सायंकाळी 6 नंतर रात्री 8 पर्यंत एकही गणेशमूर्ती मिरवणुकीत सहभागी झाली नसल्याने मिरवणुकीत विस्कळीतपणा दिसून आला. तब्बल दोन तासांनंतर काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती सहभागी झाल्या. त्यामुळे भक्तांतून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात आली. मिरवणुकीमध्ये विविध तालांवर ढोल-ताशा वाजविणाऱ्या तरुण-तरुणींनी साऱ्यांनाच थिरकायला लावले. तरुणींच्या ध्वजपथकानेही साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. रणरागिणी ध्वजपथकामधील तरुणींनी ढोल-ताशांच्या तालावर हातात ध्वज घेऊन वेगवेगळी प्रात्यक्षिके दाखविली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बॅण्डद्वारे सुमधूर भावगीते सादर करत मिरवणुकीमध्ये आपला सहभाग दर्शविला. काही मंडळांनी भजन सादर करत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर काही मंडळांनी डीजेच्या तालावर थिरकतच ही मिरवणूक काढली. रात्री उशिराने अनेक मंडळांनी सार्वजनिक गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढून मिरवणुकीत भाग घेतला. त्यामुळे विसर्जनाला उशीर झाला. या मिरवणुकीसाठी महापालिकेने सर्व ती तयारी केली होती. कपिलेश्वर तलाव येथील मोठ्या तलावावर 7 क्रेन ठेवण्यात आल्या होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तलावाजवळ आल्यानंतर गणेशमूर्तींचे पूजन करत होते. त्यानंतर महापालिकेच्या क्रेनच्या साहाय्याने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. यावर्षी गणेशमूर्तींची उंची अधिक असल्यामुळे विसर्जन करताना कार्यकर्त्यांना तसेच भक्तांना बराच त्रास घ्यावा लागला. कपिलेश्वर तलाव परिसरात महापालिकेने दिवे तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध केली होती.
शहरामध्ये जवळपास 380 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामधील बहुसंख्य मंडळांनी कपिलेश्वर तलावामध्ये विसर्जन केले. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा चौक येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे स्वागत केले. रात्री विविध मंडळांना रमाकांत कोंडुस्कर यांनी भेटी दिल्या. याचबरोबर कार्यकर्ते व भाविकांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्थाही केली होती. शहरातील बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मध्यरात्रीच गणेशमूर्ती मंडपातून बाहेर काढल्या. भक्तिमय व उत्साही वातावरणात विसर्जन मिरवणूक चालली असताना काही मंडळांनी उशीर केल्यामुळे मिरवणुकीला विलंब होत गेला. निर्माल्यासाठी अनेक ठिकाणी कुंड्यांची व्यवस्था केली होती. तरीदेखील काही जणांनी कपिलेश्वर तलावामध्येच निर्माल्य टाकले होते. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना निर्माल्य काढावे लागत होते.
महापालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना करावी लागली कसरत
गेल्या 15 दिवसांपासून गणेश विसर्जन मिरवणुकीची तयारी महापालिकेने केली होती. यासाठी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्वत: जातीने लक्ष देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. महापालिकेच्या क्रेन या परिसरातच होत्या. गणेशमूर्ती आल्यानंतर महापालिकेचे कर्मचारी क्रेनच्या साहाय्याने गणेशमूर्ती पाण्यामध्ये सोडून विसर्जन करत होते. बहुसंख्य कर्मचारी याठिकाणी रात्रभर तसेच दुसऱ्या दिवशीही थांबून होते.
तलावातील पाणी पडले कमी
यावर्षी गणेशमूर्तींची उंची अधिक होती. बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मूर्तींची उंची वाढविल्यामुळे विसर्जन करताना बरीच समस्या निर्माण झाली होती. मंडळांची संख्या व मूर्तींची उंची अधिक यामुळे तलावात असलेले पाणीही कमी पडले. त्यामुळे मूर्ती उघड्यावरच दिसत होत्या. त्यामुळे भक्तांतून नाराजी व्यक्त होत होती.
कपिलेश्वर तलाव परिसरात उसळली गर्दी…
श्रीमूर्तींचे विसर्जन पाहण्यासाठी कपिलेश्वर तलाव परिसरात मोठी गर्दी उसळली होती. दोन्ही तलावांवर सकाळपासूनच सायंकाळपर्यंत घरगुती मूर्तींचेही विसर्जन करण्यात आले. त्यानंतर सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जन करण्यासाठी-पाहण्यासाठी या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती.
पोलीस उपायुक्तांनी धरला ठेका
काही गणेशोत्सव मंडळांनी पहाटेच विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली. त्यानंतर कपिलेश्वर तलावाकडे मूर्ती नेण्यात येत होत्या. सकाळी उशीर झाला. त्यामुळे पोलिसांनी साऱ्यांनाच तातडीने गणेशमूर्ती नेण्याची सूचना केली. त्यावेळी खडक गल्ली येथील गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी ठेका धरला. त्यामुळे तरुणांमध्ये पुन्हा जोश वाढला आणि बेधुंद होऊन तरुणाई थिरकू लागली.
सोमवारपेठ, टिळकवाडी मंडळाचा स्तुत्य उपक्रम…
सोमवार व मंगळवारपेठ-टिळकवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मोठ्या उत्साहाने गणेश विसर्जन केले. विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये हभप तुकाराम पवार, धारवाडकर वारकरी विद्यापीठ, खुपिरे-कोल्हापूर येथील मुलांनी भजनी भारुड सादर केले. यावेळी भावगीत सादर करून साऱ्यांची वाहव्वा मिळविली. वज्रनाथ ढोल-ताशा पथकानेही आपली कलाकारी दाखविली. ते पाहण्यासाठी सर्वत्र गर्दी दिसून आली. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरामध्ये असलेल्या सार्वजनिक गणेशमूर्तीसमोर तरुणांनी करेला फिरवून प्रात्यक्षिके दाखविली.
माळी गल्लीच्या गणेशमूर्तीचे प्रथम विसर्जन
माळी गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्रीमूर्ती सकाळीच मंडपातून काढली. वाजत गाजत मिरवणूक काढून कपिलेश्वर तलावामध्ये त्या मूर्तीचे विसर्जन केले. माळी गल्लीने श्रीमूर्ती विसर्जनाचा पहिला मान मिळविला आहे. अत्यंत शांततेत आणि भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढून मंडळाने विसर्जन केल्यामुळे प्रशासनाने कौतुक केले.
वज्रनाथ ढोल-ताशा पथकानेही आपली कलाकारी दाखविली. ते पाहण्यासाठी सर्वत्र गर्दी दिसून आली. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरामध्ये असलेल्या सार्वजनिक गणेशमूर्तीसमोर तरुणांनी करेला फिरवून प्रात्यक्षिके दाखविली. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बॅण्डद्वारे सुमधूर भावगीते सादर करत मिरवणुकीमध्ये आपला सहभाग दर्शविला. काही मंडळांनी भजन सादर करत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर काही मंडळांनी डीजेच्या तालावर थिरकतच ही मिरवणूक काढली. रात्री उशिराने अनेक मंडळांनी सार्वजनिक गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढून मिरवणुकीत भाग घेतला. त्यामुळे विसर्जनाला उशीर झाला. या मिरवणुकीसाठी महापालिकेने सर्व ती तयारी केली होती. कपिलेश्वर तलाव येथील मोठ्या तलावावर 7 क्रेन ठेवण्यात आल्या होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तलावाजवळ आल्यानंतर गणेशमूर्तींचे पूजन करत होते. त्यानंतर महापालिकेच्या क्रेनच्या साहाय्याने गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत होते. यावर्षी गणेशमूर्तींची उंची अधिक असल्यामुळे विसर्जन करताना कार्यकर्त्यांना तसेच भक्तांना बराच त्रास घ्यावा लागला. कपिलेश्वर तलाव परिसरात महापालिकेने दिवे तसेच इतर सर्व सुविधा उपलब्ध केली होती.
शहरामध्ये जवळपास 380 हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यामधील बहुसंख्य मंडळांनी कपिलेश्वर तलावामध्ये विसर्जन केले. मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी हुतात्मा चौक येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे स्वागत केले. रात्री विविध मंडळांना रमाकांत कोंडुस्कर यांनी भेटी दिल्या. याचबरोबर कार्यकर्ते व भाविकांसाठी अल्पोपाहाराची व्यवस्थाही केली होती. शहरातील बहुसंख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मध्यरात्रीच गणेशमूर्ती मंडपातून बाहेर काढल्या. भक्तिमय व उत्साही वातावरणात विसर्जन मिरवणूक चालली असताना काही मंडळांनी उशीर केल्यामुळे मिरवणुकीला विलंब होत गेला. निर्माल्यासाठी अनेक ठिकाणी कुंड्यांची व्यवस्था केली होती. तरीदेखील काही जणांनी कपिलेश्वर तलावामध्येच निर्माल्य टाकले होते. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना निर्माल्य काढावे लागत होते.
किल्ला तलाव येथेही गणेशमूर्तींचे विसर्जन
किल्ला तलाव येथे घरगुती आणि काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींचे मोठ्या भक्तिभावाने आणि जड अंत:करणाने विसर्जन केले. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत बाप्पांना निरोप देण्यात आला. यावेळी किल्ला तलाव परिसरात फटाक्यांची आतषबाजी होत होती. घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कुटुंबासह भाविक उपस्थित होते. तर सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी मोठ्या संख्येने विविध सार्वजनिक गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि भाविक उपस्थित होते. महानगरपालिकेने किल्ला तलाव येथेही गणेशमूर्ती विसर्जनासाठी सर्वतोपरी सोय केली होती. एक क्रेन याचबरोबर निर्माल्य जमा करण्यासाठी कुंड देखील उपलब्ध करून देण्यात आले होते. याचबरोबर लाईटचीसुद्धा सोय करण्यात आली होती.
रामेश्वरतीर्थ येथेही सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन
जक्कीनहोंड (रामेश्वरतीर्थ) येथे घरगुती गणेशमूर्तींबरोबरच टिळकवाडी परिसरातील काही सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेच्यावतीने येथेही सर्व सोय केली होती. त्याठिकाणी दोन क्रेनच्या साहाय्याने श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्याठिकाणीही महापालिकेचे कर्मचारी तसेच पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता.









