भारत सरकारतर्फे आयोजित ऑनलाईन वर्ल्ड फोरम फॉर आर्ट अँड कल्चर स्पर्धेत तृतीय
कोल्हापूर प्रतिनिधी
भारत सरकारच्या वतीने ‘वर्ल्ड फोरम फॉर आर्ट अँड कल्चर’ ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत कोल्हापुरातील पाच बंगला येथे राहणाऱ्याअर्हन मिठारी याने सॅक्सोफोन हे अतिशय अवघड वाद्य वाजवत तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षक पंडीत हरीप्रसाद चौरासिया यांनी अभिषेकचे कौतुक केले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ बेंगलोर येथे डिसेंबर महिन्यात होणार आहे. अभिषेकच्या या यशाबद्दल कला क्षेत्रासह नातेवाईकांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.
भारत सरकारच्या वतीने ऑगस्ट महिन्यापासून वाद्य, गायन, नृत्य, आदी कलाप्रकाराचे आयोजन केले होते. या स्पर्धेच्या ऑनलाईन चार फेऱ्या झाल्या असून अखेरच्या फेरीत अर्हनने तृतीय क्रमांक मिळवून कोल्हापुरचे नाव जगभर पोहचवले. या स्पर्धेत जगभरातून जवळपास पाच हजार कलाकारांनी सहभाग नोंदवला होता. सॅक्सोफोन हे वाद्य हवेवर वाजवले जात असून अनेक कीज एकाचवेळी वाजवाव्या लागतात. वयाच्या अकराव्या वर्षी अर्हनने अवघड वाद्य शिकून त्याचे उत्कृष्ट ऑनलाईन सादरीकरण केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्याचे वडील संगीतकार आशिष मिठारी हेच त्याचे गुरू आहेत. अर्हन हा सेंट झेवियर्सचा विद्यार्थी असून, शाळेच्या वेळे व्यतिरिक्त दररोज तो सात तास रियाज करतो. घेतलेल्या कष्टाला यश आल्याची भावना आशिष मिठारी यांनी व्यक्त केली.









