हरिहर पोलिसांची कारवाई : सहा जणांची टोळी गजाआड, सात लाखांच्या बनावट नोटा जप्त
बेळगाव : दावणगिरी जिल्ह्यातील हरिहर पोलिसांनी बनावट नोटा तयार करणाऱ्या सहा जणांच्या एका टोळीला अटक केली आहे. त्यांच्याजवळून 7 लाख 7 हजार 700 रुपये किमतीच्या 500 व 200 च्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या टोळीने अनेक ठिकाणी बनावट नोटा चलनात आणल्याची धक्कादायक माहिती उपलब्ध झाली आहे. हरिहर तालुक्यातील हणगवाडीजवळ जिल्हा पोलीसप्रमुख उमा प्रशांत यांच्या मार्गदर्शनाखाली हरिहरचे पोलीस निरीक्षक सुरेश सगरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहा जणांच्या एका टोळीला अटक करून 500 रुपयांच्या बनावट नोटा, एक कार जप्त केली. त्यानंतर म्हैसूरजवळील मेगलकोप्पलू येथे बनावट नोटा तयार करण्यासाठी थाटण्यात आलेल्या अ•dयावर छापा टाकून बनावट नोटा, लॅपटॉप, प्रिंटर, 43 हजार रुपयांच्या खऱ्या नोटा, कोरे कागद जप्त केले आहेत.
सर्वजण दावणगिरी, म्हैसूर जिल्ह्यातील
तळवार कुबेराप्पा (वय 58), हरिश ऊर्फ हरीशगौडा (वय 29), जी. रुद्रेश (वय 39), मनोज गौडा (वय 21), संदीप (वय 30), कृष्णा नायक (वय 28) अशी त्यांची नावे असून हे सर्वजण दावणगिरी व म्हैसूर जिल्ह्यातील राहणारे आहेत. तळवार कुबेराप्पा व हरीश विरुद्ध यापूर्वीही हरिहर ग्रामीण व विजयनगर जिल्ह्यातील होसपेट टाऊन पोलीस स्थानकात बनावट नोटा खपविल्याप्रकरणी गुन्हे नोंद झाले आहेत.









