पुणे / वार्ताहर :
भेकराईनगर येथील एका जनावरांच्या डॉक्टरचे अपहरण करून त्याच्या घरातून जबरदस्तीने 27 लाख रुपयांचा ऐवज लुटून पसार झालेल्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून 12 लाखांची रोकड, मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माऊली उर्फ ज्ञानदेव महादेव क्षीरसागर, राहुल दत्तू निकम (27, रा. इंदापूर), नितीन बाळू जाधव (25, रा. इंदापूर), सुहास साधू मारकड (28), विद्या नितीन खळदकर (35, रा. सोलापूर), संतोष धोंडीबा गोंजारी उर्फ राणी पाटील (34, रा. इंदापूर) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 9 ऑगस्ट रोजी वडकी भागात ही घटना घडली होती.
फिर्यादी डॉक्टर आणि त्यांच्या पत्नीची कोर्टात घटस्फोटासाठी केस चालू होती. पोटगी रक्कम म्हणून पत्नीला 20 लाख रुपये देण्याबाबत न्यायालयाचे आदेश झाले होते. त्यामुळे फिर्यादीने 20 लाखांची तडजोड करून रक्कम घरात आणून ठेवली होती. या कालावधीत ते एका महिलेशी लिव्ह इनमध्ये राहत होते. ही महिला 9 ऑगस्ट रोजी तिच्या सोलापूर येथील माहेरी गेली होती. त्याठिकाणी नकळत तिच्या बोलण्यातून भावजयीला ही बाब समजली. हीच बाब हेरून भावजय विद्या हीने साथीदारांच्या मदतीने फिर्यादीला लुटण्याचा प्लॅन रचला. त्यानुसार संतोष धोंडीबा गोंजारी उर्फ राणी पाटील या तृतीयपंथीय व्यक्तीने फिर्यादीला श्वान आजारी असल्याचा फोन केला. श्वान आजारी पडल्याचे सांगून डॉक्टरला उपचारासाठी बोलावून घेतले. त्यानुसार डॉक्टर वडकी येथे गेले. येथून तीन चार जणांनी गाडीतून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर डॉक्टरच्या गळ्याला चाकू लावून पैशाची मागणी केली. डॉक्टरच्या घराचा पत्ता विचारून घेतला. मोबाईल आणि घराच्या चाव्या जबरदस्तीने घेऊन घरातील 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने आणि 25 लाख रुपयांची रोकड असा तब्बल 27 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने घेऊन आरोपी फरार झाले होते.
लोणी काळभोर पोलिसांनी शिताफीने तपास करून टोळीला अटक केली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.









