मिरजेच्या पोलिसासह त्रिकुटाला अटक
बेळगाव : रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेतल्या आहेत. आता याच निमित्ताने फसवणुकीचे प्रकार सुरू झाले आहेत. पाचशे रुपयांच्या पाच लाख रुपयांच्या नोटांच्या बदल्यात दोन हजाराच्या सहा लाख रुपयांच्या नोटा देण्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील त्रिकुटाला कागवाड पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये मिरज टाऊन पोलीस स्थानकातील एका पोलिसाचाही समावेश आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी शुक्रवारी यासंबंधी माहिती दिली असून या टोळीतील आणखी एक जण फरारी आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मंगसुळी येथील खंडोबा मंदिराजवळ फसवणुकीचा हा प्रकार सुरू होता. सावर्डे, ता. तासगाव, जि. सांगली येथील समीर भानुदास भोसले (वय 40) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कागवाड पोलीस स्थानकात भादंवि 420, सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रत्यक्षात बुधवार दि. 31 मे रोजी रात्री 8.05 ते 8.15 या वेळेत ही घटना घडली असून गुरुवारी 1 जून रोजी कागवाड पोलीस स्थानकात फिर्याद देण्यात आली आहे. या टोळीतील गुन्हेगारांनी अशा प्रकारे आणखी तिघांना फसविल्याचे प्रकार पोलीस तपासात उघडकीस आले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेल्या त्रिकुटाची चौकशी करण्यात येत होती. मिरज टाऊन पोलीस स्थानकातील सागर सदाशिव जाधव (वय 31), रा. मिरज, त्याचा साथीदार अरिफ अझिझ सागर (वय 34), रा. जमखंडी, लक्ष्मण नाईक (वय 36), रा. लिंगनूर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा आणखी एक साथीदार फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेने सीमाभागात एकच खळबळ माजली आहे.
उपलब्ध माहितीनुसार समीर भोसले हे कराड, जि. सातारा येथील शुअरशॉट इव्हेंट मॅनेजमेंट स्ट्रक्चर मॅनेजर म्हणून काम करतात. गेल्या चार महिन्यांपासून त्यांच्याकडे अक्षय ऊर्फ आकाश आनंदा मांडले, रा. खटाव, ता. पलूस, जि. सांगली हा साहाय्यक म्हणून काम करतो. अस्लम नामक एका व्यक्तीने अक्षयशी संपर्क साधून आम्हाला पाचशेच्या पाच लाखांच्या नोटा दिल्यास आम्ही दोन हजारांच्या सहा लाखांच्या नोटा देऊ, असे सांगितले होते. ही गोष्ट अक्षयने समीर भोसले यांच्याकडे सांगितली. या दोघाजणांनी ही माहिती आपण काम करीत असलेल्या कंपनीचे मालक संदीप शामराव गि•s, रा. तासगाव यांना कळविली. पाच लाख रुपयांच्या बदल्यात सहा लाख रुपये मिळणार, या आशेने नोटा बदलून घेण्यास ते तयार झाले. एकमेकांशी संभाषणही झाले. नोटा बदलून घेण्यासाठी लिंगनूरला बोलाविण्यात आले. सुरुवातीला समीर भोसले यांनी एक लाख रुपये बदलून देण्याची मागणी केली. त्यावर आरोपींनी त्यांना किमान पाच लाख रुपये घेऊन मंगसुळी, ता. कागवाड येथील खंडोबा मंदिरानजीक या, असा निरोप दिला. 31 मे रोजी रात्री पाच लाख रुपयांच्या पाचशे नोटांनी भरलेली बॅग घेऊन समीर भोसले व त्यांचे साथीदार अक्षय ऊर्फ आकाश मांडले हे दोघे मंगसुळीला पोहोचले. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई कारमध्ये बसलेल्या दोघाजणांनी समीर यांच्याजवळील बॅग घेऊन त्यातील नोटा मोजल्या. तितक्यात मंगसुळीकडून बुलेटवरून दोघेजण तेथे पोहोचले. त्यांच्या हातात पोलिसांची लाठी होती. त्यांनी समीर व अक्षयला दरडावले. ‘पकडा, पकडा’ असे बुलेटवरून आलेल्या दोघांनी आरडाओरडा सुरू केली. त्यावेळी पैशांची बॅग घेऊन कारमधील दोघेजण सुसाट वेगाने तेथून निघाले. त्यांच्यापाठोपाठ बुलेटवरून आलेल्या दोघाजणांनी कारमधून पळ काढलेल्यांचा पाठलाग करण्याच्या नावाखाली आपणही तेथून पळ काढला. त्यावेळी आपण फसलो गेलो, हे समीर व अक्षय यांच्या ध्यानात आले. त्यांनी त्वरित आपल्या कंपनीचे मालक संदीप गि•s यांच्याशी संपर्क साधून आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. त्यावेळी मालक संदीप पुण्यात होते. ते गावी परतल्यानंतर यासंबंधी कागवाड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला.
पोलिसाच्या अटकेपासूनच सुरुवात
अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे, अथणीचे पोलीस निरीक्षक रवी नायकोडी, कागवाडचे पोलीस उपनिरीक्षक एच. के. नेरळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित प्रकरणाचा तपास हाती घेऊन मिरज गाठले. मिरज टाऊन पोलीस स्थानकातील पोलिसासह तिघाजणांना अटक करून त्यांना कागवाडला आणण्यात आले. त्यांच्याजवळून एक लाख रुपये जप्त करण्यात आले. पोलिसांनी नोटांची 127 बंडले जप्त केली आहेत. या नोटांवर 500 च्या दहा खऱ्या नोटा लावण्यात आल्या आहेत. बाकीच्या नोटा लहान मुलांच्या खेळण्यासाठी चिल्ड्रन बँक ऑफ इंडियाच्या असलेल्या आहेत.
जिल्हा पोलीसप्रमुखांचे आवाहन
रिझर्व्ह बँकेने दोन हजारांच्या नोटा चलनातून मागे घेतल्यानंतर वेगवेगळ्या बँकातून त्या बदलून देण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे नोटा बदलून घेण्यासाठी अशा सोनेरी टोळ्यांच्या नादी लागून नागरिकांनी स्वत:ची फसवणूक करून घेऊ नये, असे आवाहन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी केले आहे. असे प्रकार करणाऱ्यांविरुद्ध 112 वर माहिती द्यावी. त्वरित कारवाई करण्यात येईल, असेही पोलीसप्रमुखांनी सांगितले आहे.









