आवळी बुद्रुक वार्ताहर
कोल्हापूरकडून राधानगरीकडे जाणाऱ्या साधूंवर मुले पळवणारी टोळी असल्याचा संशय राधानगरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी कांडगाव व आवळी बुद्रुक ग्रामस्थांनी गर्दी करून अनेक तर्कवितर्क व्यक्त करून प्रश्नांचा भडिमार केला. राधानगरी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीअंती ते खरे साधू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांना सोडण्यात आले.
स्थानिक नागरिक व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, उत्तर प्रदेश- मथुरा येथून रत्नागिरीतील गणपतीपुळे व अन्य मंदिरांना भेटी देण्यासाठी व ध्यान साधना करण्यासाठी हे तीन साधू आपल्या गाडीतून आले होते. त्यांचा रत्नागिरीकडे जाण्याचा मार्ग चुकला व ते राधानगरीकडे निघाले. त्यांना मराठी भाषेचे ज्ञान नसल्यामुळे ते कांडगाव येथे काही लहान मुलांना पुढील मार्गाची माहिती विचारत होते. लहान मुलांना त्या साधूंची भाषा समजली नाही. तेथील नागरिकांना गैरसमजातून मुले पळवणारी टोळी असल्याचा संशय आला. यासंदर्भात त्यांनी पोलिसांना कळवले. या गाडीची माहिती व वर्णन राधानगरी पोलिसांना कळताच आवळी बुद्रुक येथील पोलीस पाटील नामदेव पोवार यांना कल्पना दिली. त्यांनी पोलिसांच्या आदेशानुसार ही गाडी चौकशीसाठी थांबवण्यात आली. यावेळी कांडगाव येथील काही तरुण व आवळी बुद्रुक येथील नागरिकांनी ग्रामपंचायत आवारात गर्दी करून तर्क वितर्क व विविध प्रश्न उपस्थित केले. तात्काळ राधानगरी पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली. चौकशीअंती हे साधू साधना करण्यासाठी व महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी आले असल्याचे निदर्शनास आले. हे साधू खरे असल्याने त्यांना पुढील तीर्थटनासाठी सोडण्यात आले.
पोलीस वेळेत आले म्हणून…
या साधूना मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतले होते. उपस्थित नागरिकांना याचा तिरस्कार व राग आला होता. कांडगावहून आलेल्या तरुणांकडून रागाच्या भरात या साधूंवर हल्ला झाला असता मात्र पोलीस त्यापूर्वी घटनास्थळी आल्यामुळे हा अनर्थ टळला. सोशल मीडियाचा वापर करण्यापूर्वी नागरिकांनी कोणतीही घटना घडण्यापूर्वी अफवावर विश्वास न ठेवता त्याची शहानिशा करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.









