चौघांना अटक, तिघे जण फरार
बेळगाव : इंगळगी, ता. सौंदत्ती येथे मलप्रभा नदीकाठावर शेतकऱ्यांनी बसविलेले विद्युत पंपसेट चोरणाऱ्या चौघा जणांच्या टोळीला मुरगोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून दीड लाख रुपये किमतीचे पाच पंपसेट व साडेतीन लाख रुपये किमतीची एक अशोक लेलँड टेम्पो जप्त करण्यात आली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. मलप्रभा नदीकाठावर होसूर येथील शेतकऱ्यांनी पंपसेट बसविले होते. यापैकी पाच पंपसेट चोरण्यात आले होते. रामदुर्गचे पोलीस निरीक्षक रामनगौडा हट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर माली-पाटील, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंपसेट चोरणाऱ्या टोळीतील चौघा जणांना अटक केली आहे.
टेम्पोही जप्त
अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या टोळीतील आणखी तिघेजण अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पाच विद्युतपंपांबरोबरच पोलिसांनी अशोक लेलँड टेम्पोही जप्त केला असून या टोळीतील फरारी आरोपींना अटक झाल्यानंतर आणखी माहिती मिळणार आहे.









