रत्नागिरी / प्रतिनिधी :
रत्नागिरी तालुक्यातील खेडशी येथे घरी राहायला आलेल्या मित्रावर मित्रानेच धारधार सुऱ्याने सात वार केल्याची घटना मंगळवारी रात्री 8:45 च्या सुमारास घडली. घरगुती वादातून हे वार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या हल्ल्यात रेहान बाबामियॉ मस्तान हा जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर हल्ला करणाऱ्या विनायक हेडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जखमी रेहान बाबामियॉ मस्तान हा हिस्ट्रीसीटर असल्याचे पुढे आले आहे. तो गेल्या 1 महिन्यापासून त्याचा मित्र विनायक हेडगे याच्याकडे रहायला होता. गेले काही दिवस त्यांच्यात वाद सुरू होते. त्यातूनच हा हल्ला झाल्याचा संशय आहे. रेहान याला तत्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.









