अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा सामान्य मनुष्य कायमच संसारात रममाण झालेला असतो पण मुक्त किंवा आत्मज्ञानी पुरुष जरी संसारात रमलेला आहे असं वाटत असलं तरी तो केवळ तसं दाखवत असतो. समजा असा मनुष्य कुटुंबियांच्या बरोबर बाहेर गेलेला आहे. त्याला इतरांच्या प्रमाणे बाजारात अनेक गोष्टी दिसत असतात पण त्या गोष्टी आपल्या उपयोगाच्या नाहीत हे लक्षात आल्यावर कुटुंबियांचे मन राखण्यासाठी तो त्यांच्याबरोबर बाजारात फिरेल, त्यांना हव्या त्या वस्तू घेऊन देईल व सर्वांचे समाधान झाले की, घरी परत येईल.
ह्या पद्धतीने वरवर पाहता तो संसारात रममाण झाल्यासारखा वाटेल पण ते तेव्हढ्यापुरतच असतं. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर जगाला प्रकाश देतो परंतु त्या प्रकाशात लोक काय करत आहेत ह्याकडे तो चुकूनसुद्धा लक्ष देत नाही तसेच ईश्वर विश्वाची निर्मिती करतो परंतु माणसांनी कोणती कर्मे करावीत हे तो ठरवत नाही. त्याप्रमाणे मुक्त किंवा आत्मज्ञानी पुरुष संसारात घडणाऱ्या गोष्टी अलिप्तपणाने पहात असतो. परब्रह्म अजरामर अविनाशी असून ते स्वयंप्रकाशाने प्रकाशमान झालेले असते. आपल्याला समोर दिसणाऱ्या सर्व वस्तू मायिक असून त्यांची निर्मिती त्रिगुणांपासून झालेली असते.
मुक्त पुरुषाला त्या त्रिगुणांचा स्पर्शही होत नसल्याने, त्यापासून निर्माण होणाऱ्या विषयांचा उपभोग घेण्याचे त्याच्या मनातही येत नाही. त्यामुळे तो विषयांपासून अलिप्त असतो. तो विषयांपासून किती अलिप्त असतो हे विविध उदाहरणांनी उद्धवाला पटवून देताना भगवंत पुढे म्हणाले, घटात चंद्रबिंब दिसते पण त्याचा घटाला कधी स्पर्शही होत नाही. देहात असलेला जीवात्माही देहापासून अलिप्त असतो. त्यामुळे देह जे काही पापाचरण करत असतो ते तो अलिप्तपणे पहात असतो.
आणखीन सांगायचं म्हणजे समजा घटातल्या पाण्यात शेणमाती कालवली तरी त्या घटात असलेल्या चंद्रबिंबाला चिखल मातीचा स्पर्शही होत नाही. तसेच घटातल्या पाण्यात केशर कस्तुरी कालवली तरी घटात पडलेल्या प्रतिबिंबाला त्याचा सुवास काही लागत नाही. देहाने जरी काही पुण्यकर्म केले तरी जीवात्म्याला ते पोहोचत नाही. समजा आकाशाला जाळायसाठी भरपूर तूप घालून महाअग्नी पेटवला तरी आणि त्याच्या ज्वाळा आकाशाला जाऊन भिडल्या तरी आकाश कधीच जळत नाही. त्याप्रमाणे विषयांचा कल्लोळ जरी उठला तरी मुक्त पुरुषाला त्यापासून काहीच फरक पडत नाही.
जरी विषयभोगांपासून त्याला सुख मिळतंय असं वाटत असलं तरी तो ह्या सर्वांपासून अलिप्त असतो. मुक्त पुरुष भोगत असलेल्या भोगांचे वर्म ज्याला कळलेले असते तो स्वत: देही असून विदेही असतो. त्यामुळे त्याला भोगापासून आनंद मिळतो हा सर्वसामान्यांना होत असलेला भ्रम होत नाही. त्यामुळे तो स्वत: ब्रह्म झालेला असतो पण लोकांना भ्रम होतो आणि त्याला भ्रम होत नाही हे म्हणणे सुद्धा चुकीचे आहे कारण यात द्वैत आले.
प्रत्यक्षात अक्षरता अभंग असते. तेव्हा जे ज्ञानी लोक स्वत:ला ज्ञानी समजून इतरांना अज्ञानी समजतात त्यांना देहाभिमान होत असतो. त्यातूनच विषयांची गोडी लागून निश्चितच बद्धता येते. म्हणून बद्धतेचे निवारण करण्यासाठी विषयलोलुपता सोडून द्यावी. कारण विषयत्याग केल्याशिवाय नित्यमुक्तता घडत नाही. असा नित्यमुक्त न होताच साधक ज्ञानी झाला तरी त्याने विषयाची आसक्ती बाळगू नये. प्रारब्धभोगानुसार वाट्याला येतील ते भोग भोगावेत पण ते आणखीन हवेत असा हव्यास नसावा. जनकमहाराज जरी देही असून विदेही असले तरी वाट्याला आलेले राजभोग भोगत होते पण त्यात त्यांना आसक्ती वाटत नव्हती म्हणून त्यांना राजर्षी म्हणतात.
क्रमश:








