अध्याय अठ्ठाविसावा
देह आणि आत्मा ह्यातील फरक भगवंत उद्धवाला समजावून सांगत होते. ते म्हणाले, उद्धवा आत्मज्ञानी पुरुषाला माझे अपरोक्ष ज्ञान झालेले असते. तो एका आसनावर बसून माझे अखंड ध्यान करत असल्याने त्याला त्याचा अधिक लाभ मिळतो. मी आत्माराम त्याच्या शरीरात प्रकट होतो. त्यामुळे तो भवसागरी बुडत नाही. प्रारब्धानुसार इंद्रियांची संगत लाभून दैवयोगाने विषयोपभोग भोगायला मिळाले तरी त्याची ब्रह्मस्थिती भंगत नाही कारण साधकाला माझे स्वयंप्रकाशीत स्वानंदघन असलेले निजधाम प्राप्त झालेले असते. त्यामुळे त्याला विषय बाधत नाहीत. येथून पुढे भगवंत सूर्याचे उदाहरण देऊन ते स्वत: कसे ह्या संसारापासून अलिप्त आहेत ते सांगत आहेत. ते म्हणाले, ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर लोक झोपेतून उठून आपापल्या कामाला लागत असले तरी त्यांच्या त्या कृतीपासून दिनमणी संपूर्णपणे अलिप्त असतो. कारण त्याला त्यांच्या कर्माशी काहीही देणेघेणे नसते. त्याप्रमाणे मी परमात्मा स्वयंज्योती माझ्या प्रकाशाने समस्त विश्वाला कार्य करण्याची ऊर्जा देत असलो तरी त्यापासून मी अलिप्त असतो. मी लोकांना त्यांची कर्मे नेमून देत नाही किंवा ते जी कोणती कर्मे करत असतात त्यांचे कर्तेपण बहाल करत नाही. ते करत असलेली कर्मे त्यांच्या त्यांच्या स्वभावानुसार होत असतात. भगवंतांचे बोलणे ऐकल्यावर उद्धव म्हणाला देवा, तुम्ही सांगताय ते मला पटले. तुम्ही स्वत: समस्त विश्वापासून तसेच सूर्यदेव जगाच्या व्यवहारापासून अलिप्त आहेत हे मी मान्य करतो परंतु मुक्तपुरुष तर स्त्राrपुत्र, घरदार ह्यात गुंतलेला असतो मग त्याला मी, तो नि:संग आहे असे कसे म्हणू? उद्धवाच्या ह्या प्रश्नाचे उत्तर भगवंत पुन्हा सूर्याचेच उदाहरण देऊन सांगणार आहेत. ते म्हणतात, उद्धवा सूर्य डोळ्यांना जरी दिसत असला तरी तो आपल्यापासून कितीतरी दूर आहे. त्यामानाने ढग आपल्यापासून खूपच जवळ असतात. आपल्या आणि सूर्याच्या मध्ये ढग आले की, आपल्याला सूर्य दिसेनासा होतो. त्यामुळे आपण म्हणतो की, सूर्याला ढगांनी झाकून टाकले आहे किंवा आभाळ आलंय असंही आपण म्हणत असतो. प्रत्यक्षात सूर्य आणि ढग ह्यांच्यातल्या अंतराचा विचार केला तर दोघांची कधीच गाठ पडणं शक्य होत नाही. अगदी तसंच संसारात रमलेला आत्मज्ञानी पुरुष जरी संसारसुखात रममाण झाला आहे असं वाटत असलं तरी त्या इंद्रीयसुखाची बाधा त्याला कदापि होणे शक्य नसते. ह्याचं कारण असं की, आत्मज्ञानी पुरुष संसारसुखापेक्षा कितीतरी उच्च दर्जाचे सुख सदैव उपभोगत असतो. तसेच सामन्यांचे संसारसुख हे कोणत्या ना कोणत्या कारणावर अवलंबून असते. त्यामुळे ते कारण जसजसे जुने होत जाईल तसतसे संसार सुखातील नाविन्य संपते. ह्याउलट आत्मज्ञानी पुरुष कोणत्याही कारणाशिवाय सुखाच्या लहरी अनुभवत असल्याने त्याला कधीही ओहोट हा शब्द लागू होत नाही. ह्या सगळ्याची कल्पना असल्याने आत्मज्ञानी पुरुष जरी संसारसुखात रममाण झालेला दिसत असला तरी मनाने तो त्यापासून कितीतरी दूर असतो कारण त्यातील निरर्थकता त्याला समजलेली असते. लहान मुलांच्या आग्रहाखातर मोठी माणसे त्यांच्या भातुकलीत सामील होताना दिसतात. त्यांना हे सर्व मिथ्या आहे ह्याची जाणीव असल्याने ते उगीच आपलं त्यात रमल्यासारखे दाखवतात पण प्रत्यक्षात त्यात ते कधीच रमत नाहीत. आत्मज्ञानी पुरुषही संसारात रमल्यासारखा वाटतो पण ते तेव्हढ्यापुरतेच असते. म्हणजे येथे आपल्या डोळ्याची फसगत झालेली असते. सूर्य आणि आपण ह्यांच्या मध्ये ढग आल्यामुळे आपल्याला सूर्य दिसत नाही आणि आपण म्हणतो सूर्य झाकला गेलाय पण प्रत्यक्षात आपलेच डोळे ढगांनी झाकले गेले असल्याने आपल्याला सूर्य दिसत नाही. प्रत्यक्षात ढग आले काय आणि गेले काय सूर्याला काहीच फरक पडत नाही. त्याप्रमाणे आत्मज्ञानी पुरुषाला संसारात सुख दु:ख काहीही येउदेत तो आपला निर्विकार असतो.
क्रमश:








