आगामी पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकमध्ये देण्यात येणाऱ्या पदकांमध्ये एक विशिष्ट रचना दिसून येईल, असे आयोजकांनी उघड केले आहे. पॅरिस गेम्समधील एकूण 5,084 सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांमध्ये मूळ आयफेल टॉवरमधून काढलेला षटकोनी आकाराचा लोखंडाचा तुकडा समाविष्ट असेल आणि तो त्यांच्या केंद्रस्थानी असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
सदर सहाधारी धातूच्या पदकांची रचना ही मौल्यवान रत्नांसारखी असेल आणि प्रतिष्ठित फ्रेंच सराफी आस्थापन ‘चौमेट’ने तयार केलेल्या डिझाइनची त्याला जोड मिळेल, असे सांगण्यात आले आहे. आम्हाला पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकमधील सर्व पदकविजेत्यांना 1889 च्या आयफेल टॉवरचा एक तुकडा द्यायचा होता, असे स्थानिक आयोजन समितीचे प्रमुख टोनी एस्टँग्युए यांनी सांगितले.
‘चौमेट’च्या या डिझाइनमध्ये प्रकाश पकडण्याच्या उद्देशाने गोलाकार मांडणी देखील आहे. ‘चौमेट’ची उत्पादने 1780 पासून अभिजात व श्रीमंत वर्गाच्या पसंतीची राहिली आहेत. फ्रान्समधील ‘ओल्ड लेडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘आयफेल टॉवर’ची देखभाल करणाऱ्या कंपनीद्वारे साठवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या पॅरिसच्या गोदामातून त्यासाठी धातू घेण्यात आला आहे. ‘आम्हाला असे आढळून आले की, आयफेल टॉवरच्या देखभालीदरम्यान त्यांना काही मूळ रचना काढून टाकणे बंधनकारक होते. आम्ही हे तुकडे वापरले आहेत’, असे समारंभ संचालक थिएरी रेबोल यांना माध्यमांना सांगितले. बोधचिन्ह, शुभंकर आणि उद्घाटन समारंभासह पदकाची रचना हाही ऑलिम्पिकच्या वैशिष्ट्यांचा मुख्य भाग असतो.









