वृत्तसंस्था / काठमांडू
नेपाळमध्ये सध्या राजेशाही पुन्हा प्रस्थापित करावी, यासाठी प्रचंड आंदोलन होत आहे. केवळ राजेशाहीच नव्हे, तर नेपाळ हे पुन्हा हिंदूराष्ट्र व्हावे, यासाठीही या देशात सर्वत्र आंदोलने केली जात आहेत. विशेष बाब अशी की, या आंदोलनाचे नेतृत्व एकेकाळचे एकनिष्ठ माओवादी आणि हिंदुविरोधक दुर्गा प्रसाई हे करीत आहेत. 2008 मध्ये नेपाळमधील राजेशाही नष्ट झाली. तसेच नेपाळचा जगातील एकमेव हिंदूराष्ट्र हा परिचयही मिटविण्यात आला. तथापि, त्यानंतर नेपाळमध्ये जी राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे, ती पाहता पूर्वीची राजेशाही आणि हिंदू राष्ट्र हा परिचय अधिक सुसह्या होता, असे लक्षावधी नेपाळींचे मत बनले आहे. त्यांच्यात अनेक पूर्वाश्रमीचे माओवादीही आहेत. दुर्गा प्रसाई यांचेही आता मनपरिवर्तन झाले असून ते आता कट्टर हिंदूराष्ट्र समर्थक बनले आहेत.









