बैसाखी उत्सवादरम्यान अपघात, बचावकार्य सुरू
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील उधमपूरमध्ये शुक्रवारी बैसाखी उत्सवादरम्यान एक फूटब्रिज कोसळला. ही घटना चेनानी विभागातील बैन गावात घडली असून या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. बचावकार्य सुरू असल्याचे उधमपूरचे एसएसपी डॉ. विनोद यांनी सांगितले. अपघाताचे व्हिडिओही व्हायरल झाले असून यामध्ये मोठ्या संख्येने लोक फूटब्रिजवर चढल्याचे पाहायला मिळत आहे. अतिभारामुळे ही दुर्घटना घडल्याचा दावा पोलीस अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
उधमपूरच्या बैन गावात बैसाखीच्या दिवशी जत्रेचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये लोक मोठ्या संख्येने सहभागी होतात. यावेळीही जत्रेत मोठी गर्दी झाली होती. यादरम्यान पुलावर जास्त लोक चढल्याने हा अपघात झाला. हा फूटब्रिज परिसरातील नागरिकांनी पैसे जमा करून बांधल्याचा दावा केला जात आहे.









