लंकेचा प. डाव 164 धावांत समाप्त, करुणारत्नेचे अर्धशतक
वृत्तसंस्था वेलिंग्टन
येथे सुरू असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी न्यूझीलंड संघाकडून लंकेला फॉलोऑनची नामुष्की पत्करावी लागली. लंकेचा पहिला डाव 164 धावात आटोपल्यानंतर लंकेने दुसऱ्या डावात दिवसअखेर 2 बाद 113 धावा जमवल्या आहेत. लंकेचा संघ अद्याप 303 धावांनी पिछाडीवर असून यजमान न्यूझीलंड ही मालिका एकतर्फी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
या मालिकेत न्यूझीलंडने पहिली कसोटी जिंकून यापूर्वीच आघाडी घेतली आहे. या दुसऱ्या कसोटीत विलियम्सन आणि निकोल्स यांच्या द्विशतकांच्या जोरावर न्यूझीलंडने पहिला डाव 4 बाद 580 धावांवर घोषित केला होता. त्यानंतर लंकेने 2 बाद 26 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली आणि त्यांचा पहिला डाव 66.5 षटकात 164 धावात आटोपला. कर्णधार करुणारत्नेने एकाकी लढत देत 188 चेंडूत 9 चौकारासह 89 तर चंडिमलने 4 चौकारासह 37 आणि मधुशेकाने 3 चौकारासह 19 धावा जमवल्या. लंकेच्या उर्वरित फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. न्यूझीलंडतर्फे हेन्री आणि मिचेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 3 तर साऊदी, डग ब्रेसवेल, टिकनेर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडच्या पहिल्या डावात लंकेवर 416 धावांची भक्कम आघाडी मिळवल्याने त्यांनी लंकेला फॉलोऑनसाठी पाचारण केले.
416 धावांनी पिछाडीवर असलेल्या लंकेने दुसऱ्या डावात दिवसअखेर 43 षटकात 2 बाद 113 धावा जमवल्या. सलामीचा ओशादो फर्नांडो 5 धावांवर तर कर्णधार करुणारत्ने 51 धावांवर बाद झाले. करुणारत्नेने या कसोटीतील दोन्ही डावात अर्धशतके झळकवली. दुसऱ्या डावात त्याने 83 चेंडूत 4 चौकारासह 51 धावा जमवल्या. कुशल मेंडीस 8 चौकारासह 50 तर मॅथ्यूज एका धावेवर खेळत आहेत. न्यूझीलंडतर्फे डग ब्रेसवेल आणि साऊदी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यातील खेळाचे दोन दिवस बाकी असून लंकेचा संघ केवळ आपला मोठा पराभव लांबवण्यासाठी झगडत आहे.
संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड प. डाव 4 बाद 580 डाव घोषित, लंका प. डाव 66.5 षटकात सर्वबाद 164 (करुणारत्ने 89, चंडीमल 37, मधुशेका 19, हेन्री 3-44, मिचेल ब्रेसवेल 3-50, साऊदी 1-22, डग ब्रेसवेल 1-19, टिकनेर 1-21), लंका दु. डाव 43 षटकात 2 बाद 113 (ओशादो फर्नांडो 5, करुणारत्ने 51, कुशल मेंडीस खेळत आहे 50, मॅथ्यूज खेळत आहे 1, साऊदी, 1-9, डग ब्रेसवेल 1-20).









