रणजी ट्रॉफीत धावांचा दुष्काळ ; मुंबईकडून रोहित-यशस्वी, पंजाबकडून शुभमन गिल तर दिल्लीकडून पंतही अपयशी : जडेजाचा मात्र धमाका
वृत्तसंस्था/मुंबई, बेंगळूर, नवी दिल्ली
भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या फॉर्मच्या शोधात आहे. यासाठी रोहितने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जवळपास 10 वर्षांनंतर रणजीमध्ये परतल्यावरही तो अपयशी ठरला. तब्बल दशकभरानंतर रणजी करंडक सामना खेळायला आलेला रोहित जम्मू-काश्मीरविरुद्ध मुंबईत झालेल्या सामन्यात पहिल्या डावात केवळ तीन धावा करून बाद झाला. रोहितच नाही तर यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर आणि मुंबईचा कर्णधार अजिंक्य रहाणे यांची बॅटही शांत राहिली. दुसरीकडे पंजाब-कर्नाटक यांच्यातील सामन्यात शुभमन गिल आणि दिल्ली-सौराष्ट्र सामन्यात ऋषभ पंतही फ्लॉप ठरला.
घरच्या मैदानावर न्यूझीलंड, बॉर्डर -गावसकर ट्रॉफीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत रोहितची बॅट शांत होती. अशा परिस्थितीत रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी रणजीमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर 2015 नंतर प्रथमच तो रणजी सामना खेळायला आला होता, पण इथेही तो फ्लॉप ठरला. आता त्याच्याकडून दुसऱ्या डावात धावांची अपेक्षा असेल. याशिवाय, जैस्वाल, श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे यांनाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही.
मुंबईचा संघ 120 धावांत ऑलआऊट
कर्णधार अजिंक्य रहाणेने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण तो त्याच्यावरच उलटला. संघाची टॉप ऑर्डर अवघ्या 40 धावांत कोसळली. यानंतरही संघाच्या विकेट्स सातत्याने जात राहिल्या, परिणामी संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचता आले नाही आणि केवळ 120 धावांवर संघ सर्वबाद झाला. रोहित शर्मा (03), अजिंक्य रहाणे (12), श्रेयस अय्यर (11), यशस्वी जैस्वाल (4), शिवम दुबे (0), इतके बडे खेळाडू असतानाही संघाला केवळ 120 धावा करता आल्या. शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 51 धावा केल्या. तनुष कोटियनने 26 धावांचे योगदान दिले. यामुळे मुंबईला शतकी मजल मारता आली.
बडोद्याविरुद्ध महाराष्ट्राच्या 7 बाद 258 धावा
नाशिकमध्ये सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीतील सामन्यात बडोद्याविरुद्ध महाराष्ट्राने पहिल्या दिवशी 7 बाद 258 धावा केल्या आहेत. सलामीची जोडी लवकर बाद झाल्यानंतर सिद्धेश वीरने 48 धावांची खेळी केली. कर्णधार ऋतुराज गायकवाड 10 धावा काढून बाद झाला तर सौरभ नवलेने अर्धशतकी खेळी साकारताना 8 चौकारासह नाबाद 60 धावा फटकावल्या. पहिल्या दिवसअखेरीस नवले 60 तर रजनीश गुरबानी 22 धावांवर खेळत होते.
कर्नाटकविरुद्ध पंजाबचे सपशेल लोटांगण
रणजी ट्रॉफीतील कर्नाटकविरुद्ध लढतीत पंजाबचा संघ अवघ्या 55 धावांत गारद झाला. पंजाबचा कर्णधार शुभमन गिलला केवळ 4 धावा करता आल्या. रमणदीप सिंगने सर्वाधिक 16 धावांचे योगदान दिले. यानंतर कर्नाटकने मात्र शानदार सुरुवात करताना पहिल्या दिवसअखेरीस 50 षटकांत 4 गडी गमावत 199 धावा केल्या आहेत.
जडेजाचा धमाका, पंतची मात्र निराशा
दिल्ली आणि सौराष्ट्र यांच्यातील सामन्यात पंत फक्त एक धाव काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पंत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचाही भाग आहे. पंतला 10 चेंडूत एक धाव काढता आली. दिल्लीला पहिल्या डावात केवळ 188 धावा करता आल्या. कर्णधार आयुष बडोनीने सर्वाधिक 60 धावा केल्या. सौराष्ट्राकडून रविंद्र जडेजाने मात्र शानदार गोलंदाजी करताना 66 धावांत 5 विकेट्स घेतल्या. सौराष्ट्राने पहिल्या डावात खेळताना पहिल्या दिवशी 5 बाद 163 धावा केल्या आहेत. अद्याप ते 25 धावांनी पिछाडीवर आहेत.









