महापालिकेकडून नाव-आडनावात चुकीचा उल्लेख, दुरुस्तीसाठी नागरिकांची धावपळ
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेकडून जन्म-मृत्यू दाखले देताना चुकीच्या नावांचा उल्लेख केला जात असल्याने नागरिकांना नाहक आर्थिक फटका बसत आहे. मागील काही दिवसांत योग्य अर्ज देऊनदेखील चुकीच्या पद्धतीने कन्नडमध्ये नावांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे हे चुकीचे उल्लेख काढण्यासाठी नागरिकांना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
शहर परिसरात जन्म झाल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र महानगरपालिकेकडून दिले जाते. महापालिकेकडे अर्ज दाखल केल्यानंतर जन्म प्रमाणपत्र दिले जाते. इंग्रजी भाषेत देण्यात आलेल्या अर्जांमधील नाव कन्नडमध्ये ट्रान्स्लेट करण्यात येत आहे. परंतु यावेळी नाव, तसेच आडनावांचा गोंधळ होत आहे. अनेक नावांचा चुकीचा उल्लेख जन्म प्रमाणपत्रावर करण्यात आला आहे. यामुळे नवीन आधारकार्ड करतानाही नागरिकांना अडचणी येत आहेत.
सर्व माहिती योग्य देऊनदेखील कर्मचाऱ्यांच्या चुकांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तसेच चुकीचा उल्लेख काढण्यासाठी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. मागील महिन्याभरात अशा अनेक तक्रारी महापालिकेकडे आल्या आहेत. या चुका वेळीच सुधारणे गरजेचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना समज देऊन कामामध्ये नीटनेटकापणा आणणे गरजेचे आहे. काही पालकांनी चुकीचा उल्लेख केल्याबद्दल कार्यालयात जाऊन नाराजीही व्यक्त केली आहे.









