सांगली / संजय गायकवाड :
एक दोन नव्हे तर चार चार वेळा महापुराचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर पुन्हा एकदा महापूर सांगलीच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. नाही नाही म्हणत यंदाही पूर आणि महापुराने सांगलीच्या फज्जाला अखेर शिवलेच, ५७ फुटाची अभूतपूर्व पाणी पातळी पाहिलेले सांगलीकर ४२ अगर ४५ फुटालाही घाबरत नाहीत. पण सांगलीकरांनी कितीवेळा महापुराचा अनुभव घ्यायचा हा प्रश्न आहे. सांगलीला कृष्णानदीच्या पाणी पातळीतील वाढ आणि पूर आणि महापूर हा साधारणपणे जुलैच्या अखेरीस आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येतो. मात्र यंदा जरा उशिर झाला. पण उशिरा का होईना पण पूर आणि महापुराने सांगलीकरांची झोप उडविली आहे. हे मात्र निश्चित.
चारवेळा महापुराचा कटू अनुभव घेतल्यावर पुन्हा पाचव्यांदा पूर आणि महापूर म्हणजे आता सांगलीकरांच्या डोक्यावरून पाणी चालले आहे. अतिवृष्टी झाली म्हणायचे, कोयनेला पाऊस थांबत नाही असे सांगायचे, अलमट्टीतून विसर्ग होत नाही असे म्हणायचे जे काही आहे त्यावर सांगलीकरांनी विश्वास ठेवायचा, चार पाच दिवस महापुराचा अनुभव घ्यायचा आणि पुन्हा मागे तेच पुढे याप्रमाणे लोकही पूर आणि महापूर विसरून जातात.
प्रशासन आपल्या नेहमीच्या कामाला लागते. पुन्हा यावर कधी चर्चा होत नाही. पण महापूर आणि पुराच्या पाण्यावर कधी गांर्भियाने चर्चा आणि तोडगा निघणार आहे की नाही याबाबत कोणीही बोलत नाही. निव्वळ घोषणा होतात. पण प्रत्यक्षात मात्र कार्यवाही काहीही होत नाही. पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाडयाला नेण्याची तसेच नद्या जोड प्रकल्पाबाबत अनेकवेळा राज्य शासनाकडून घोषणा झाल्या. पण प्रत्यक्षात मात्र ठोस कृती दिसत नाही.
पुराचे पाणी दुष्काळी भागाला वा मराठवाडयाला देण्याचा विषय असो यावर एका दिवसात तोडगा निघणार नाही. दरवर्षी टप्पाटप्पाने राज्य शासनाकडून कृती व काम करायला हवे. तरच यावर कायमस्वरूपी तोडगा निघेल अन्यथा दरवर्षी सांगलीला महापूर आणि पूर येणार याबाबत शंका घेण्यास वावच नाही.
सांगलीला पूर आणि महापूर हे जणू समीकरणच होवून बसले आहे. सांगलीकर काहीही सहन करतात. याचा अर्थ दरवर्षी सांगलीकरांना पाण्यात बुडवा असा होत नाही. पूर आणि महापूर हा काही चार दिवसाचा विषय राहिला नाही. हे दरवर्षीचे दुखणे झाले आहे.
सांगलीला यापूर्वी २००५, २००६, २०१९ आणि २०२१ असा चार वेळा महापूर येऊन गेला आहे. २००५ च्या अगोदरही सांगलीला महापूर येऊन गेलेले आहेत. पण त्यावेळी सांगली हे एक छोटे गाव होते. आता सांगलीची लोकसंख्या आणि विस्तार खूप वाढला आहे. बाजारपेठेचे गाव असल्याने सांगलीची वाढ चारही बाजूला होत आहे. येथे होलसेल व रिटेल बाजार चालतो.
पश्चिम महाराष्ट्रात पुण्यानंतरही मोठी बाजारपेठ सांगलीला आहे. पूर आणि महापुराचे पाणी दरवर्षी नवीन भागात शिरते. त्याला कारणेही अनेक आहेत. कोयना अलमट्टी यांच्यातील विसर्ग, अतिवृष्टी यासह सांगलीतील नैसर्गिक नाल्यावरील अतिक्रमणे आणि पूरपट्टयातील अनाधिकृत बांधकामे असे अनेक घटक याला कारणीभूत आहेत. यावर जशी ठोस कारवाई होत नाही. तशीच ती पुराच्या पाण्यावर उपाययोजना म्हणूनही होत नाही. हे सांगलीकरांचे दुर्दैव आहे. पण दरवर्षी पूर व महापुराची धास्ती आहे हे नक्की.
- … अलमट्टीवर गांर्भियाने चर्चा व्हायला हवी…!
अनेक व्यापाऱ्यांनी सांगलीच्या गावठाणातून आमबाग, विजयनगर, चांदणी चौक अशा सुरक्षित ठिकाणी दुकाने हलविली. तर काहींनी विश्रामबागसारख्या भागात नव्या शाखा सुरू करून व्यवसाय सुरू ठेवले. टिंबर एरियात २०१९ ला महापुराचे पाणी आल्यावर येथील बहुतांश व्यापाऱ्यांनी बुधगाव रोडवर जागा घेवून तिकडे दुकाने सुरू केली. हा महापुराचाच परिणाम आहे. सर्वच व्यापाऱ्यांना शक्य नाही. महापुराला अनेक घटक कारणीभूत आहेत. पण अलमट्टीच्या विसर्गाबाबत गांर्भियाने चर्चा व्हायला हवी.
– सर्जेराव पाटील, महापूर नियंत्रण कृती समिती सांगली
- महापुराच्या पाण्यावर राज्य शासनाकडून निश्चित तोडगा निघेल!
पूर आणि महापुरामुळे सांगलीचे यापूर्वी मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासन म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही सर्व मंडळी पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्या पाण्याबाबत निश्चितपणे तोडगा काढतील, अशी मला आशा आहे.
-केदार खाडीलकर, व्यापारी सांगली
- कायमस्वरूपी तोडगा काढा!
२०१९ च्या महापुरावेळी सांगलीतील दत्त मारूती रोड, गावभाग, सांगलीवाडी, कापड पेठ, हरभट रोड, सराफ बाजार, शिवाजी मंडई, स्टेशन रोड, टिंबर एरिया, वखारभाग, कॉलेज कॉर्नर, बायपास रोड अशा जवळपास सर्व महत्वाच्या नागरी वस्त्या आणि विशेषकरून बाजारपेठांमध्ये महापुराचे पाणी शिरले. हे पाणी जवळजवळ चार पाच दिवस हलले नव्हते. त्यावेळी बाजारपेठेला मोठा आर्थिक फटका बसला होता. व्यापाऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले होते. दरवर्षी महापूर सांगलीकरांना परवडणार नाही.
-समीर शहा, व्यापारी हरभट रोड सांगली








