खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर
बेळगाव ; सतत वर्दळ असलेल्या ताशिलदार गल्लीतील एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी दीड लाखांचा सोन्या, चांदीचा ऐवज लांबविल्याची घटना सोमवारी भर दुपारी घडली आहे. या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून खडेबाजार पोलीस स्थानकामध्ये चोरीची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. श्रीपाल जीवाप्पा काळप्पगोळ (मूळचे रा. नंदीकुरबेट, सध्या रा. ताशिलदार गल्ली) यांच्या घरी चोरीचा हा प्रकार घडला आहे. काळप्पगोळ व त्यांचे कुटुंबीय सकाळी 11.30 वाजता फ्लॅटला कुलूप लाऊन बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी कडीकोयंडा फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटातील 5 ग्रॅम सोन्याची अंगठी, 3.5 ग्रॅमचे मंगळसूत्र, 3.5 ग्रॅमचे दोन सोन्याचे लॉकेट, 10 ग्रॅम कानातील झुमके आणि टॉप, 50 ग्रॅम लक्ष्मी देवीचा चांदीचा मुखवटा असा एकूण दीडलाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. जवळपास दोन तास बाहेर जाऊन घरी आल्यानंतर घराचा कडीकोयंडा फोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी पाहणी केली असता कपाटातील साहित्य विस्कटून पडल्याचे दिसले. कपाटातील सोन्या, चांदीचे दागिने लंपास झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर या घटनेची माहिती खडेबाजार पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. खडेबाजार पोलीस पुढील तपास करीत आहेत.









