प्रतीक कुमार महातो हा पाच वर्षे वयाचा विद्यार्थी ऋषिकेश येथील केंद्रीय शाळेत शिकत आहे. इतक्या लहान वयातच त्याने महाज्ञानी अशी ख्याती प्राप्त केली आहे. कोणतेही पुस्तक किंवा विषय एकदा त्याने वाचला की त्याला तो मुखोद्गत होतो. त्यामुळे तो सध्या केवळ पहिल्या यत्तेत असला तरी, पुढच्या अनेक यत्तांचा त्याचा अभ्यास तयार आहे आणि तो पाचव्या, सहाव्या यत्तेतील कोणत्याही प्रश्नांची उत्तरे लीलया देतो, असे त्याचे शिक्षक म्हणतात.
ज्या वयात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना 1 ते 100 हे आकडेही नीट म्हणता येत नाहीत, त्या वयात प्रतीकला रसायनशास्त्रातील संपूर्ण आर्वत सारिणी अर्थात पिरियॉडिक टेबल, ज्यात 118 मौले विशिष्ट क्रमाने मांडलेली असतात, ते तोंडपाठ आहे. त्याची बुद्धीमत्ता केवळ अद्भूत आहे. त्याच्या या असामान्य बौद्धिक क्षमतेचा शोध त्याच्या शिक्षिका नमिता राय यांना सर्वप्रथम लागला. त्यांनी त्वरित त्याच्या मातापित्यांना त्याची कल्पना दिली. हळूहळू त्याची प्रसिद्धी होत गेली. तो आता जणू बौद्धिक चमत्कारांपैकी एक मानला जाऊ लागला आहे.
त्याच्या शाळेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी एकदा त्याच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी त्याला रसायनशास्त्रातील पिरियॉडिक टेबलसंबंधी माहिती विचारली. त्याने अक्षरशः काही मिनीटांमध्येच या संपूर्ण आर्वत सारिणी त्यातील मौलांच्या विशिष्ट क्रमांकासह आणि स्थानांसह घडाघडा म्हणून दाखविली. जो अभ्यासक्रम दहावी किंवा महाविद्यालयात शिकविला जातो, तो त्याला कसा माहित झाला, या प्रश्नाचे उत्तर त्याचे पिता रोशनलाल महातो हे देतात. त्याच्यापेक्षा मोठय़ा वयाच्या त्याच्या बहिणीला ते घरीच गणित आणि विज्ञान हे विषय शिकवतात. ते तिला जे शिकवतात ते प्रतीक ऐकत राहतो. असे ऐकूनच त्याला ते पाठ झाले. अशा या असामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याकडे समाज. त्याचे पालक आणि सरकार यांनी नीट लक्ष द्यावे आणि त्याला आवश्यक ते साहाय्य करावे, अशी मागणी होत आहे.









