नावाची अद्यापही निश्चिती नाही, अनेक नेते चर्चेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सध्या होत असून त्यासंबंधात दिल्लीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक मंगळवारी पार पडली आहे. 5 तास ही बैठक चालली. मात्र, कोणताही चेहरा अद्याप निश्चित झालेला नाही, असे समजते. मंगळवारच्या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथसिंग, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मावळते राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महासचिव दत्तात्रेय होसबाळे यांचा समावेश होता, अशी माहिती देण्यात आली. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे महासचिव बी. एल. संतोष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संयुक्त महासचिव अरुण कुमार यांचीही उपस्थिती होती. ही बैठक राजनाथसिंग यांच्या निवासस्थानी मंगळवारी दुपारी पार पडली. काही वृत्तमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार लवकरच भारतीय जनता पक्ष एका कार्यकारी अध्यक्षाची नियुक्ती करणार आहे. मात्र, काही नेत्यांच्या मते तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतरच कार्यकारी अध्यक्ष निवडला जाणार आहे. आमच्याशी विचारविमर्श करुनच पक्षाने आपला नवा अध्यक्ष निवडावा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधींनी या बैठकीत स्पष्ट केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या माहितीला दुजोरा मिळालेला नाही.
नड्डा आता मंत्री
2019 मध्ये जगतप्रकाश नड्डा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बनले होते. त्यानंतर 2020 मध्ये ते पूर्णकालीन अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. त्यांचा कार्यकाळ जून 2024 पर्यंत वाढविण्यात आला होता. नंतर त्यांची केंद्रीय मंत्रिपदी नियुक्ती करण्यात आल्याने आता ते अध्यक्षपदी राहणार नाहीत, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे त्यांचा उत्तराधिकारी निवडला जात आहे.
पत्रकारांना नव्हता प्रवेश
मंगळवारची बैठक पक्षांतर्गत बैठक असल्याने पत्रकारांना प्रवेश देण्यात आला नव्हता. परिणामी, बैठकीत सहभागी झालेल्या नेत्यांनी नंतर घडामोडींविषयी माहिती दिली. राजनाथसिंग यांच्या म्हणण्यानुसार या बैठकीत बांगला देशातील हिंदूंच्या परिस्थितीविषयीही चर्चा करण्यात येऊन त्यांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करण्यात आली. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे.
कोणती नावे चर्चेत…
सध्या भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांची नावे राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. शिवराजसिंग चौहान, देवेंद्र फडणवीस, भूपेंद्र यादव, विनोद तावडे आदी नावांवर प्रसार माध्यमांमधून अनेकदा चर्चा रंगली आहे. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातच राहतील, असा निर्णय झाल्याने त्यांचे नाव मागे पडले आहे. कदाचित कोणाच्याही ध्यानीमनी नसलेला चेहरा पुढे येण्याची शक्यता आहे. कारण भारतीय जनता पक्षाकडून अशा धक्कातंत्राचा उपयोग पूर्वी अनेकदा करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणतेही निश्चित अनुमान व्यक्त करणे अशक्य आहे, असे मत पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनीही व्यक्त केले आहे.









