खरेदी करण्यासाठी लावावी लागते बोली
माशांचा आहारात समावेश असलेले लाखो लोक जगात आहेत. सर्वसाधारणपणे बाजारात मासे सर्वसामान्यांना परवडतील अशा किमतीत मिळतात. परंतु जगातील एक सर्वात महागडय़ा माशाची किंमत जाणून तुम्ही दंग व्हाल. हा मासा शेकडो-हजारोंमध्ये नव्हे तर कोटय़वधी रुपयांमध्ये खरेदी करावा लागतो.
जगातील सर्वात महागडा मासा टून फिश आहे. हा मासा जपानमध्ये आढळून येतो. याचे वजन 200 किलोपेक्षा अधिक असू शकते. या माशाचे आयुर्मान 40 वर्षांपेक्षा अधिक असते. जानेवारी महिन्यात जपानची राजधानी टोकियोमध्ये 212 किलो वजनाच्या टूना माशाचा लिलाव झाला होता. या माशाला लिलावात 2 लाख 73 हजार डॉलर्सची किंमत प्राप्त झाली होती. म्हणजेच हा मासा सुमारे 2 कोटी 23 लाख 42 हजार रुपयांमध्ये विकला गेला होता.

हा मासा व्हेलप्रमाणेच जगातील सर्वात मोठय़ा माशांपैकी एक आहे. टूना फिश उत्तर धुवीय समुद्र आणि प्रशांत महासागरात आढळून येतो. परंतु सर्वात मोठय़ा आकाराचा टूना मासा प्रशांत महासागरात सापडतो. या माशाला ब्ल्यूफिन टूना देखील म्हटले जाते. सर्वसाधारणपणे हा मासा खोल समुद्रात वावर असतो आणि पृष्ठभागावर फारच कमी प्रमाणात येत असतो. तर दुसऱया भागांमध्ये आढळणाऱया टूना माशाला ‘येलोफिन टूना’ म्हटले जाते. याचे वजन सुमारे 70 किलोच्या आसपास असते.
हा मासा इतका महाग का विकला जातो असा प्रश्न निश्चितच पडला असेल? हा मासा महाग असण्यामागे अनेक कारणे आहेत. याचा स्वाद उत्तम मानला जातो. तसेच यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन बी12, प्राटीन, ओमेगा-3 फॅटी ऍसिड, सेलेनियम, मॅग्निशियम आणि कॅल्शियम यासारखे पोषक घटक आढळतात. याचबरोबर हा मासा फारच कमी प्रमाणात आढळून येतो. अशा सिथतीत मागणी आणि पुरवठय़ात मोठे अंतर असल्याने याचे दर गगनाला भिडले आहेत.









