कोल्हापूर :
अलमट्टी धरणाची उंची वाढवून राज्याचे नुकसान होणार असेल तर कर्नाटक सरकारच्या या निर्णया विरोधात राज्य सरकार केंद्र सरकारकडे ठोस भुमिका मांडेल. दोन्ही राज्यांच्या पाणी प्रश्नासाठी सर्वसमावेशक तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल, असे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे बुधवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. सभापती शिंदे म्हणाले, अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याबाबत दोन्ही राज्यांमध्ये नेटके नियोजन असणे गरजेचे आहे. धरणाची उंची वाढवून कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकरी, रहिवासी, उद्योजक, व्यवसायिक यांचे नुकसान होणार असेल याबाबत सरकार ठोस भुमिका केंद्र सरकारकडे मांडेल असे सभापती शिंदे यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, विधान परिषदेचा सभापती झाल्यानंतर दूसऱ्यांदा कोल्हापूरमध्ये आलो आहे. पहिल्या भेटीमध्ये येथील करवीर निवासिनी अंबाबाई आणि श्री क्षेत्र जोतिबा मंदिर विकास आराखडा प्रलंबित होता. मात्र चौंडी (जि. आहिल्यानगर) येथे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त झालेल्या मंत्रीमंडळाच्या परिषदेत या दोन्ही आराखड्यांसाठी निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे कोल्हापूरच्या दूसऱ्या भेटीत प्रलंबित असलेला विकास आराखड्याच्या प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद असल्याचे सभापती शिंदे यांनी सांगितले.
- कोण,कोणसोबत जाईल हे पुढे कळेलच
राज्यात सध्या अनेक बोलण्या सुरु आहेत. राज ठाकरे–उदय सामंत, उद्धव ठाकरे–राज ठाकरे, अजित पवार–सुप्रिया सुळे यांच्या भेटीवरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत. मात्र कोण कोणासोबत जाणार हे पुढील काळातच स्पष्ट होईल. याबाबत सध्या बोलणे योग्य ठरणार नसल्याचे शिंदे यांनी सांगितले.
- चौंडी येथे पंतप्रधान येतील
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचा 31 मे रोजी होणारा 300 वा जयंती सोहळा संपूर्ण देशभरात साजरा करण्याचे नियोजन आहे. चौंडी येथे होणाऱ्या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित राहण्यासाठी निवेदन दिले आहे. पीएमओ कार्यालयाकडुन आहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन या कार्यक्रमाची माहिती मागवली आहे. त्यामुळे या कार्यक्रमास चौंडे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतील असा विश्वास असल्याचेही सभापती शिंदे यांनी सांगितले.








