कोल्हापूर / इम्रान गवंडी :
छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रूग्णालयासह (सीपीआर) जिल्ह्यात 14 तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रामार्फत वर्षभरात जनजागृतीने 1026 जणांची तंबाखू सोडवली आहे. तंबाखूजन्य पदार्थाविरोधात आरोग्य विभाग व पोलिसांनी 2115 जणांवर कारवाई करत त्यांच्याकडून 3 लाख 54 हजार 905 रूपयांचा दंड वसूल केला आहे. तरीही अद्याप अनेकजण तंबाखूच्या जाळ्यात अडकल्याची स्थिती आहे. वर्षभराच्या आकडेवारीनुसार 8820 रूग्णांची नोंदणी समुपदेशन केंद्रात झाली आहे. जिल्ह्यात तंबाखूमुक्तीसाठी 527 संस्था कार्यरत आहेत.
जागतिक तंबाखू विरोधी दिन हा दरवर्षी 31 मे रोजी जगभरात साजरा केला जातो. तंबाखूचे सेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तंबाखू किंवा धूम्रपानामुळे व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. हे माहीत असतानाही अनेकजण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तंबाखूचे सेवन करत आहेत. बिडी, सिगारेट, गुटखा आदींच्या सेवनाने कर्करोगासह विविध आजारांचा धोका वाढतो. अशा स्थितीत तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या हानीबाबत लोकांना जागरुक करण्याच्या उद्देशाने जागतिक तंबाखू विरोधी दिन दरवर्षी साजरा केला जातो. तंबाखू, निकोटीन उत्पादनांच्या आकर्षणाचा पडदा उघडणे आणि जिवांचे रक्षण करणे ही यंदाची थीम आहे.
सीपीआर सुमदेशन केंद्राच्यावतीने वर्षभर विविध कार्यक्रम राबवून शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, गावपातळीवर जनजागृती केली जाते. या माध्यमातून तंबाखूच्या सेवनामुळे मुख, फुफ्फुसांचा कर्करोग, हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह आदी गंभीर आजाराबाबत लोकामध्ये जनजागृतीसह सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान बंदी, तंबाखू उत्पादनांवरील जाहिरातींवर निर्बंध व 18 वर्षांखालील मुलांना तंबाखू विक्रीवर बंदी यासारख्या कायद्यांचा प्रसार केला जात आहे. प्रत्येक जिह्यात प्रभातफेरी, व्याख्याने आणि शिबिरांचे आयोजन केले जात आहे. यामुळे तंबाखूच्या व्यसनाला विरोध करण्यासाठी थोडाफार हातभार लागत आहे.
- वर्षाला 10 लाखाहून अधिक मृत्यू
देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्येत लक्षणिय वाढ होत आहे. वर्षाला 10 लाखांहून अधिक लोक तंबाखूच्या सेवनाने मृत्यूमुखी पडत असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार समोर आले आहे. यामध्ये महिलांचाही आकडा वाढत असल्याचे समोर आले आहे.
- तंबाखू सेवनामुळे होणारे आजार
फुफ्फुस, यकृत, तोंड, गर्भाशय, आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका असतो. याशिवाय हृदयविकार व मानसिक आजारही होऊ शकतात.
- 2024 ते 2025 तंबाखू नियंत्रण अहवाल असा :
–तंबाखू मुक्ती केंद्रांची संख्या : 14
–केंद्रात नोंदणी झालेले रूग्ण : 8820
–तंबाखू सेवन सोडलेले रूग्ण : 1026
–कॅन्सरग्रस्त संशयित रूग्ण : 783
–कॅन्सरग्रस्त रूग्ण : 63
–तंबाखूमुक्त शाळा : 137
–दंडात्मक कारवाई संख्या : 2115
–दंड वसुली रक्कम : 3,54,905 रूपये








