सरकार दरबारी प्रयत्न करणार : पुरातत्त्वमंत्री सुभाष फळदेसाई यांचे उद्गार, कुंकळ्ळीतील लढ्याला 440 वर्षे पूर्ण
कुंकळ्ळी : कुंकळ्ळीत झालेला पोर्तुगीज सत्तेविऊद्धचा लढा हा आशिया खंडातील अशा प्रकारचा पहिला लढा होता. कुंकळ्ळीच्या 1583 च्या लढ्याला वेगळे महत्त्व असून राज्य सरकारने त्याला राजमान्यता देऊन त्याचा इतिहास पाठ्यापुस्तकात आणला आहे. आता या स्मारकाचा विकास व्हायला हवा. तसेच या लढ्याच्या इतिहासाची माहिती देशभरात पसरावी त्यासाठी त्यावर चित्रपट किंवा माहितीपट साकारण्याची गरज आहे. आपली याकरिता वेळेप्रसंगी सर्वांबरोबर वाटा उचलण्याची तयारी आहे. आपण विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या सहयोगाने याकामी सरकार दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असे समाजकल्याण व पुरातत्त्व खात्यांचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले.
राज्य सरकार, कुंकळ्ळी चिफ्टन्स मेमोरियल ट्रस्ट व कुंकळ्ळी पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कुंकळ्ळीतील लढ्याला 440 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कुंकळ्ळीतील पोर्तुगीजांविरुद्धचा लढा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यास प्रेरक ठरला. संपूर्ण देशाला त्याने स्वातंत्र्यलढ्याची वाट दाखवून दिली. त्यावेळी जुलमी पोर्तुगीजांच्या धर्मांतराच्या सत्राने मंदिरे उद्धवस्त झाली होती आणि जनतेच्या मनात भीती निर्माण झाली होती. धर्मरक्षणासाठी व देव-देवतांचे पावित्र्य जपण्यासाठी लोकांनी आपल्या देव-देवतांसह जंगलात पलायन केले होते. कुंकळ्ळीकरानी पोर्तुगीजांना आव्हान देण्याचा पराक्रम केला, असे फळदेसाई म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, वेळ्ळीचे आमदार क्रूझ सिल्वा, पर्यटन खात्याचे सचिव संजीव आहुजा, कुंकळ्ळीचे नगराध्यक्ष लेंड्री मास्कारेन्हस आणि चिफ्टन्स ट्रस्टचे अध्यक्ष ऑस्कर मार्टिन्स उपस्थित होते. युरी आलेमाव म्हणाले की, कुंकळ्ळीचा लढा हा जुलमी राजवटीविऊद्धचा आणि आपली संस्कृती व स्वत्व राखण्यासाठी होता. कुंकळळी चिफ्टन्स ट्रस्ट समितीने त्याची दखल घेऊन इतिहासाच्या पाठ्यापुस्तकात त्याला योग्य स्थान मिळावे याकरिता कष्ट घेतले. 40 ही आमदारांनी विधानसभेत त्यासंबंधीच्या ठरावाला मान्यता दिली, याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले.
27 वर्षांचे परिश्रम फळास आले
हा इतिहास पाठ्यापुस्तकात समाविष्ट करण्यासाठीच्या समितीवर हिंदू, ख्रिस्ती, मुस्लिम असे सर्व धर्मांचे प्रतिनिधी होते. कुंकळ्ळीकरांनी आम्ही एक आहोत हा संदेश दिला आहे. कुणीही त्यांच्यात फूट पाडू शकणार नाही. पाठ्यापुस्तकात इतिहासाच्या समावेशाने 27 वर्षांचे परिश्रम फळास आले आहेत. 16 महानायकांच्या व कुंकळ्ळीच्या शौर्यास प्रत्येकाने सलाम करायलाच हवा. महानायकांच्या शौर्याने पावन झालेली कुंकळ्ळीची भूमी प्रेरणादायी आहे, असे आलेमाव म्हणाले. मंत्री फळदेसाई यांनी आपल्या खात्यामार्फत स्मारकाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सूचविले.
मान्यवरांचा सन्मान
सुरुवातीला मान्यवरांनी स्मारकाच्या ठिकाणी महानायकांना पुष्पांजली वाहिली. पोलीस पथकाने यावेळी मानवंदना दिली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून कुंकळ्ळीतील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यात आरोग्य खात्याच्या निवृत्त संचालिका डॉ. आयरा आल्मेदा यांना कुंकळळी भूषण सन्मान, निवृत्त पोलीस अधीक्षक व तियात्र दिग्दर्शक सॅमी तावारीस व सेवानिवृत्त सरकारी अधिकारी शिवाजी देसाई यांना कुंकळळी श्री सन्मान, माजी मंत्री व कुंकळ्ळीचे माजी आमदार ज्योकीम आलेमाव यांनी केलेल्या कार्याची पावती म्हणून त्यांना कुंकळळी मित्र सन्मान, तर यशस्वी दुग्ध उत्पादक सुरेंद्र देसाई यांना कुंकळळी ज्योती सन्मान प्रदान करण्यात आला. ज्योकीम आलेमाव यांचा पुरस्कार त्यांच्या कन्या राईसा मॅडोना आलेमाव यांनी स्वीकारला. यावेळी पाठ्यापुस्तकात कुंकळ्ळीचा इतिहास समाविष्ट करण्याच्या बाबतीत मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भगीरथ शेट्यो तसेच वल्लभ केळकर व इतरांचा सन्मान करण्यात आला.
कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील प्रदूषण गंभीर बाब : युरी आलेमाव
या समारंभात बोलताना युरी आलेमाव यांनी कुंकळ्ळीतील प्रदूषणाबाबत संताप व्यक्त केला. लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ते हानिकारक आहे. कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत जे प्रदूषण होत आहे ती गंभीर व चिंतेची बाब आहे. विरोधी पक्षनेते म्हणून लोकांच्या समस्या मांडण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. विधानसभा अधिवेशनात यासह जनतेच्या ज्या काही समस्या आहेत त्याकडे सरकारचे लक्ष वेधणार आहे, असे त्यांनी सांगितले.









