रंगांची उधळण करत घेतला आनंद : आकर्षक वेशभूषा ठरल्या लक्षवेधी
बेळगाव : आला होळीचा सण लय भारी, आज गोकुळात रंग खेळतो हरी, खेळताना रंग बाई होळीचा, रंग बरसे भिगे चुनरवाली अशा मराठी, हिंदी गीतांच्या तालावर ठिकठिकाणी लावलेल्या स्प्रिंक्लर्सच्या तुषारांचा आनंद घेत जोडीला हलगी वाजवत शहर परिसरात बालचमू, तरुणाई आणि नागरिकांनी अत्यंत हर्षोल्हासाने रंगोत्सव साजरा केला. शुक्रवारी सकाळपासूनच रंगोत्सवासाठी तरुणाईचा जल्लोष दिसून आला. उपनगरांपेक्षा शहराच्या मध्यवर्ती भागात डीजेवर थिरकण्यासाठी मोठ्या प्रमाणात तरुणांसह तरुणीही दाखल झाल्या होत्या. एकमेकांना रंग लावत धूलिवंदनाचा आनंद साजरा करण्यात आला. या निमित्ताने आकर्षक वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. विविध आकारातील मुखवटे, तसेच वेशभूषा करून तरुण रंगोत्सवाचा आनंद घेत होते. नागरिकांना रंगांचा आनंद घेता यावा यासाठी अनेक गल्ल्यांमध्ये स्प्रिंक्लर बसविण्यात आले होते. डीजेच्या तालावर बेभान होऊन थिरकणाऱ्या तरुणाईचा स्प्रिंक्लरच्या पाण्याने आनंद द्विगुणित झाला. शहरातील चव्हाट गल्ली, खडक गल्ली, गवळी गल्ली, गेंधळी गल्ली, तेंगीनकेरा गल्ली, मेणसी गल्ली, पांगुळ गल्ली यासह टिळकवाडी व अनगोळ परिसरात स्प्रिंक्लर बसविण्यात आले होते.
शेतांमध्ये रंगल्या पार्ट्या
रंगोत्सवाचा आनंद घेतल्यानंतर शेतांमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले होते. काहीजणांनी पैसे देऊन हॉटेल, तसेच फार्महाऊस निवडले. तर काहींनी शहराजवळच्या वडगाव, अनगोळ, शहापूर, जुने बेळगाव, झाडशहापूर परिसरातील शिवारांमध्ये पार्ट्यांचे आयोजन केले होते. यामुळे दुपारनंतर शिवारांमध्ये तरुणाईंची ये-जा वाढली होती.
शहर परिसरात शुकशुकाट
धूलिवंदन असल्याने बाजारपेठेतील सर्वच दुकाने शुक्रवारी बंद ठेवण्यात आली होती. केवळ शहरातच नाही तर उपनगरांमध्येही दुकाने बंद होती. खासगी कार्यालये, तसेच उद्यमबाग येथील कारखाने बंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला. एरव्ही गजबजणाऱ्या बाजारपेठेच्या मुख्य परिसरात शुक्रवारी मात्र शांतता होती. ग्रामीण भागातील काही भाजीविक्रेते सायंकाळी शहरात आले. परंतु भाजीची विक्रीच होत नसल्याने ते पुन्हा माघारी फिरले.
पांगुळ गल्लीत पारंपरिक लोटांगण 
पांगुळ गल्ली येथील अश्वत्थामा मंदिर हे देशातील एकमेव अश्वत्थामा मंदिर असल्याने या मंदिराची देशभर ख्याती आहे. धूलिवंदनाच्या दिवशी याठिकाणी लोटांगण घालण्याचा कार्यक्रम पार पडला. बेळगावसह परिसरातील 10 हजारहून अधिक नागरिकांनी लोटांगण घातल्याने हा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. अश्वत्थामा मंदिरासमोर पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली जाते. गुरुवारी रात्री होळीचे दहन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी टप्प्याटप्प्याने लोटांगण घालण्यात आले. त्यानंतर आरती करून गाऱ्हाणे घालण्यात आले. हा धार्मिक कार्यक्रम पाहण्यासाठी गोवा, महाराष्ट्रातील भाविकदेखील उपस्थित होते.









