पाकिस्तानात पत्रकार ठार ः 24 तासांपूर्वी इम्रान यांची घेतली होती मुलाखत
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
शाहबाज शरीफ सरकारच्या राजीनाम्याची मागणी करत लाँच मार्च काढणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ताफ्याने रविवारी एका महिला पत्रकाराचा जीव घेतला आहे. या महिला पत्रकाराचे नाव सदफ नईम आहे. सदफ ही लाँग मार्चचे वृत्तांकन करत होती. तिने शनिवारीच इम्रान यांची मुलाखत घेतली होती. इम्रान असलेल्या कंटेनरमधूनच ती प्रवास करत होती, परंतु कुणीतरी धक्का दिल्याने ती खाली कोसळली आणि कंटेनरचे चाक तिच्या मानेवरून गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
इम्रान यांनी शुक्रवारी लाहोर येथून लाँच मार्च सुरू केला होता. इम्रान यांचा हा मोर्चा 4 नोव्हेंबर रोजी इस्लामाबादमध्ये पोहोचणार आहे. इम्रान हे तेथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करणार आहेत. शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा आणि देशात त्वरित सार्वत्रिक निवडणूक व्हावी अशी इम्रान यांची मागणी आहे.
महिला पत्रकाराचा मृत्यू झाल्यावर इम्रान यांनी सोमवारी हा मोर्चा एक दिवसासाठी रोखण्याची घोषण केली. नईम सदफ यांनी शनिवारी रात्रीच इम्रान यांची मुलाखत घेतली होती. नईम सदफ यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करत असल्याचे लाहोर पोलिसांनी म्हटले आहे. पंतप्रधान शाहबाज यांनी दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सदफ यांच्या कुटुंबाला सरकार मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
इम्रान यांच्या लाँग मार्चमुळे शाहबाज शरीफ सरकारची कोंडी झाली आहे. 28 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा मोर्चा बेमुदत सुरू राहणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान हे पाकिस्तानच्या दौऱयावर येणार आहेत. पाकिस्तानातील बिघडलेली स्थिती पाहता सलमान हा दौरा करणार असल्याचे मानले जात आहे.
याचबरोबर पंतप्रधान शाहबाज हे 1 नोव्हेंबर रोजी चीनच्या दौऱयावर जाणार आहेत. देशातील राजकीय गदारोळाच्या स्थितीत चीन आता पाकिस्तानला कितपत मदत करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.









