संगीताचा आस्वाद घेत खवय्यांचा चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव
प्रतिनिधी/ बेळगाव
खाद्यप्रेमींसाठी पर्वणी ठरलेल्या रोटरी अन्नोत्सवाला शनिवारी मोठी गर्दी झाली होती. संगीताचा आस्वाद घेत खवय्यांनी चमचमीत खाद्यपदार्थांवर ताव मारला. शुक्रवारी गायक सागर चंदगडकर याने सादर केलेल्या सुमधूर गीतांना बेळगावच्या रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अन्नोत्सवात विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल असल्याने रात्री उशिरापर्यंत गर्दी नियंत्रणात आणणे आयोजकांना कठीण झाले.
रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने रोटरी अन्नोत्सवाचे आयोजन केले आहे. सावगाव रोड येथील अंगडी कॉलेजच्या प्रांगणात अन्नोत्सव भरविण्यात आला आहे. जवळपास 200 खाद्यपदार्थांचे व गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आल्याने खरेदीसाठी व खाद्यपदार्थांची चव चाखण्यासाठी खवय्यांची गर्दी होत आहे.
शनिवारी अलग रिदम या बँडने परफॉर्मन्स सादर केला. बॉलीवूडच्या अजरामर गाण्यांनी रसिकांना थिरकायला लावले. परिपूर्ण खाद्यपदार्थांची मेजवानी उपलब्ध असल्याने खवय्यांचा प्रतिसाद दिसून आला. शाकाहारी विभागातील स्टॉल क्र. 68 वर भैय्या समोसे, छोले बटूरे यासह इतर स्नॅक्स उपलब्ध आहेत. स्टॉल क्र. 20 वर मांसाहारीप्रेमींसाठी मंटूस सावजी येथे मटन चॉप्स, खिमा बॉल, पायासूप असे सावजी खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.
स्टॉल क्र. 37, 38 वरील तडका स्टॉलवर चिकन, खिमा बॉल असे विविध सावजी खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांची रेलचेल आहे. रविवार दि. 12 रोजी शानदार संगीत कार्यक्रम होणार असल्याने खाद्यप्रेमींनी संगीत कार्यक्रमाचा आस्वाद घेत खाद्यपदार्थांची चव चाखावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.









