भारतीय जनता पक्षाचा केजरीवालांवर गंभीर आरोप
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
आम आदमी पक्षाने त्याच्या सत्ताकाळात 2016 ते 2023 या कालावधीत 24 मंदिरे तोडली आहेत, असा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी यासंबंधातील कागदपत्रांचाही उल्लेख केला आहे. केजरीवाल यांच्या आदेशावरुन ही मंदीरे पाडविण्यात आली असून दोन मशिदींना मात्र वाचविण्यात आले आहे, असा पूनावाला यांचा आरोप आहे.
आम आदमी पक्षाने दिल्लीतील जनतेची फसवणूक केली आहे. या पक्षाइतका ‘फसवा’ पक्ष आपल्या देशात दुसरा कुठलाही नाही. या पक्षाचे नेते आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या अनेक मंत्र्यांनी गेल्या पाच ते सहा वर्षांमध्ये दिल्लीतील अनेक मंदिरे पाडविण्याचे आदेश त्यांच्या स्वाक्षरीनिशी दिले आहेत, अशी कागदपत्रे उपलब्ध आहेत. ही कागदपत्रे म्हणजे आधुनिक काळातील फतवेच आहेत. अशी 24 मंदिरे तोडण्यात आली आहेत. केजरीवाल यांचे उजवे हात समजले जाणारे दिल्लीचे माजी गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी अशी आठ मंदिरे तोडण्याचा आदेश दिला होता. तथापि, याच जैन यांनी दोन अवैध मशिदींचे मात्र संरक्षण केले होते. 2016 मध्ये जैन दिल्लीचे गृहमंत्री असताना, त्यांनी दिल्लीच्या जनतेचा विरोध असताना ही कारवाई केली होती. तथापि, यासंबंधी आम आदमी पक्षाने आतापर्यंत मौन पाळले आहे. आता सोशल मिडियावरुन ही वृत्ते प्रसिद्ध होऊ लागल्याने या पक्षाची तारांबळ उडाली आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
हिंदूविरोधी पक्ष
आम आदमी पक्ष कमालीचा हिंदूविरोधी आहे. इतका हिंदूविरोधी पक्ष अन्य कोणताही नाही. विरोधी पक्षांच्या आघाडीतील द्रमुक, डावे पक्ष, काँग्रेस आदी पक्षांनी हिंदूविरोध हेच त्यांचे ध्येय मानले आहे. द्रमुकने तर सनातन धर्मावर अत्यंत गलीच्छ भाषेत टीका केली आहे. तथापि, आम आदमी पक्षाने द्रमुकविरोधात एक शब्दही उच्चारलेला नाही, अशीही टीका पूनावाला यांनी केली.
आरोपांचे कारण काय…
1 जानेवारी या दिवशी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतीशी मारलेना यांनी भारतीय जनता पक्षाने दिल्लीतील मंदिरे तोडण्याचा आदेश दिला होता, असा आरोप केला होता. 22 नोव्हेंबरला केंद्र सरकारच्या धार्मिक समितीने दिल्लीतील अनेक मंदिरे तोडण्याचा आदेश काढला होता. दिल्लीच्या विविध भागांमध्ये असलेली अनेक मंदिरे तोडली जावीत असे केंद्र सरकारच्या या आदेशात स्पष्ट करण्यात आल्याचा दावा आतीशी मारलेना यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आम आदमी पक्षावर हा आरोप केला आहे.









