प्रियकरासह आईचीही साथ : खुनात बळी पडलेला खानापूरचा रहिवासी
खानापूर : पुण्यात वडगाव शेरी येथे पत्नी, मुलगी आणि मुलगीचा प्रियकर यांनी प्रेमास विरोध करणाऱ्या आपल्याच बापाचा खून करून मृतदेह जाळून टाकला होता. सदर घटना दि. 30 मे रोजी पुण्यात घडली होती. खून झालेला जॉन्सन लोबो हा खानापूर येथील रहिवासी होता. या खुनाचे वृत्त खानापुरात समजताच हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खानापूर येथील जॉन्सन लोबो हे नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झाले होते. वडगाव शेरी भागात स्वत:च्या मालकीच्या फ्लॅटमध्ये पत्नी सॅन्ड्रा लोबो आणि एक अल्पवयीन मुलगी यांच्यासह रहात होते. जॉन्सन लोबो हे एका नामांकित कंपनीत नोकरीला होते. जॉन्सन यांच्या मुलीचे वडगाव शेरी येथील अनिल कसबे या युवकाबरोबर प्रेम जुळले होते. या प्रेमास जॉन्सन यांचा विरोध होता. यामुळे वेळोवेळी पत्नी सॅन्ड्रा आणि मुलगी यांच्यात भांडणे होत होती. आपल्या मुलीच्या प्रेमाला विरोध होत असल्याचे पाहून पत्नी सॅन्ड्रा हिने आपल्या पतीच्याच खुनाचा कट रचला. वेबसेरीजवर खुनाचे व्हिडिओ पाहून खून करण्याचे ठरविण्यात आले. यात आपल्या मुलीच्या प्रियकराची साथ घेण्यात आली. दि. 30 मे रोजी रात्री जॉन्सन लोबो जेवण करून झोपी गेल्यानंतर घरातील दगड डोक्यात घालण्यात आला. त्यानंतर धारधार शस्त्राने पोटावर वार करण्यात आले. यात जॉन्सन यांचा मृत्यू झाला. एक दिवस मृतदेह घरी ठेवून 31 मे रोजी रात्री सॅन्ड्रा आणि त्याची मुलगी यांनी सॅन्ट्रो कारमधून मृतदेह सारसवाडी येथे आणून जाळून टाकला. मात्र चेहऱ्याचा भाग जळलेला नव्हता. त्यामुळे जॉन्सन लोबो यांची ओळख पटली.
पत्नी, मुलगीसह प्रियकर अटक
पुणे ग्रामीण पोलिसांनी याबाबत तीन दिवस संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहून सॅन्ट्रो कारच्या आधारे या खुनाचा तपास लावला. खुनाचा संशय येऊ नये म्हणून सॅन्ड्रा लोबो ही आपल्या पतीच्या मोबाईलवर स्टेटस अपलोड करत होती. तसेच फ्लॅटमध्ये संशय येऊ नये म्हणून सर्वांबरोबर मिसळून वागत होती. मात्र पोलिसांनी खुनाचा तपास लावून सॅन्ड्रा लोबो, अनिल कसबे आणि अल्पवयीन मुलीला अटक केली आहे.
खानापुरात हळहळ व्यक्त
जॉन्सन लोबो हे खानापूर येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील हे टेलर काम करत होते. तर आई या समाज कल्याण खात्यातून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांना दोन मुले होती. यापूर्वी मोठ्या मुलाचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर जॉन्सनचा खून करण्यात आला आहे. जॉन्सन लोबो हे खानापुरात सर्वांबरोबर प्रेमाने आणि आदराने वागत होते. ख्रिस्ती समाजात त्यांचे सामाजिक योगदान होते. त्यांच्या दुर्दैवी मृत्यूने खानापुरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.









