प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे तसेच जोरदार वाऱयामुळे वझे गल्ली, वडगाव येथील झाड कोसळले. सुदैवानेच मोठा अनर्थ टळला. यासह आणखी काही झाडे धोकादायक आहेत. ही झाडे काढणे गरजेचे होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर हे झाड कोसळले.
वझे गल्ली येथील कीर्तीकुमार कुलकर्णी यांच्या घराजवळ असलेले झाड शुक्रवारी कोसळले. यामध्ये कीर्तीकुमार यांच्या घराचे थोडे नुकसान झाले. यावेळी त्या ठिकाणी मोटारसायकली पार्किंग केल्या होत्या. शाळांना सुटी असल्याने मुलेही या परिसरात खेळत होती. मात्र, सुदैवानेच ते झाड खुल्या जागेत कोसळले. आणखी एक झाड कधी कोसळेल याचा नेम नाही. तेव्हा वनविभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
कॅम्प येथे घरावर कोसळले झाड
कॅम्प येथे पहाटे साडेचार वाजता महेंद्र देशपांडे यांच्या घरावर झाड कोसळले. झाड कोसळल्याने कौले फुटून आतील साहित्याचेही नुकसान झाले आहे. वेंगुर्ला रोडवरही एक झाड कोसळले. या दोन्ही घटनांमुळे वाहतुकीची मात्र कोंडी झाली. कॅन्टोन्मेंटतर्फे झाड हटविण्याचे काम त्वरित हाती घेण्यात आले.









