A fair of poets was held in Vengurla
वेंगुर्ले ही मंगेश पाडगांवकर व महान संसदपटू बॅ. नाथ पै यांची जन्मभूमी आहे. वि. स. खांडेकर, जयवंत दळवी, चि. त्र्यं खानोलकर, गुरूनार धुरी, वीरधवल परब अशा साहित्यिकांची साहित्य नगरी आहे. आनंदयात्री वाड़्मय मंडळ हे साहित्यिक आणि वाचक यांचे एक कुटुंब असून कादंबरीकार वृंदा कांबळी या ‘वृंदावनासारख्या ‘ या साहित्य दरबाराचे अंगण फुलवित आहेत. कविता ही समाजमनाचा आरसा असते. कवीनी समाजातील दांभिकतेवर प्रहार करावेत. परिवर्तनवादी विचार मांडावेत. परिवर्तन म्हणजे तोडफोड नसून नवनिर्मिती होय. तीनही काळांच्या भाळावर उभी राहाणारी रचना म्हणजे कविता असते. वेदनाना शब्द देते, शोषितांना धीर देते आणि शोषकांच्या विरोधात आवाज उठवण्यास मदत करते ती कविता. अंतर्मुख करणारी कविता अधिक जीवंत असते असे सांगून कविता ही एक अध्यात्म असते. वेंगुर्ल्यातील आनंदयात्री वाड़्मय मंडळ म्हणजे कलाविष्काराचे केंद्रबिंदू आहे असे प्रतिपादन चांदणझुला या कवीसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना कवी विठ्ठल कदम यानी केले.
आनंदयात्री वाड़्मय मंडळ वेंगुर्ले यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारी सुंदरभाटले वेंगुर्ले येथील साई दरबार हॉलमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी विठ्ठल कदम यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरात कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी विठ्ठल कदम, सुप्रसिद्ध लेखिका तथा ज्येष्ठ कवीयत्री वृंदा कांबळी, आनंदयात्रीचे प्रतिनिधी डाॅ. संजीव लिंगवत, सत्कारमूर्ती संजय पाटील व महेश राऊळ आदींचा समावेश होता.
या कार्यक्रमात संजय पाटील यांना विद्यापीठाचा सन्मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सामाजिक कामातील विशेष योगदानाबद्दल सर्पमित्र महेश राऊळ व प्रा. सचीन परुळकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला.कवीसंमेलनात वेंगुर्ले तालुक्यातील पंचवीस नवोदित कवीनी आपापल्या कविता सादर केल्या. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या उत्साही कवीसंमेलनात अनेक रसिक श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती.
वेंगुर्ला / प्रतिनिधी